EntertainmentMarathi

इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’ ‘गोंधळ’मधील पहिलं भावनिक गाणं प्रदर्शित

संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘चांदण’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. प्रेम आणि नात्यांच्या कोमल भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पद्मविभूषण इलैयाराजा यांनी या गाण्याला दिलेलं संगीत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच मराठी गाण्याला संगीत दिले आहे.

YouTube player

पारंपरिकतेचा साज आणि आधुनिकतेचा सूर यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या ‘चांदण’ मध्ये अजय गोगावले, आर्या आंबेकर आणि अभिजीत कोसंबी या तीन लोकप्रिय गायकांच्या आवाजाचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. त्यांच्या भावनांनी भरलेल्या आवाजाने गाण्याला जिवंतपणा आणि आर्तता लाभली आहे. हे गाणं एकाचवेळी हळवं, रोमँटिक आणि आत्मस्पर्शी वाटतं. योगेश सोहोनी आणि इशिता देशमुख यांच्या जोडीवर चित्रित झालेल्या या गाण्याचे सादरीकरणही मंत्रमुग्ध करणारं आहे. प्रत्येक फ्रेम नात्यातील नाजूक क्षण उलगडते आणि संगीतासोबत दृश्यांची जुळवाजुळव ‘चांदण’ला सिनेमॅटिक अनुभव देऊन जाते.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘’या गाण्याला संगीतकार इलैयाराजा यांच्यासारख्या दिग्गजांनी संगीतबद्ध करणं, हे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. ‘चांदण’ हे गाणं म्हणजे भावनांचा एक सुंदर प्रवास आहे. या गाण्याद्वारे आम्ही प्रेमाच्या गाभ्याला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. अजय, आर्या आणि अभिजीत यांनी त्यांच्या आवाजाने या गाण्याला आत्मा दिला आहे.”

डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट आता ‘चांदण’च्या सुरेलतेने आणि इलैयाराजा यांच्या संगीताच्या तेजाने सजला आहे आणि प्रेक्षकांसाठी हे गाणं म्हणजे एक भावनिक संगीतयात्रा ठरणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *