EntertainmentMarathi

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित

मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी’ असे म्हणत ‘द फोल्क आख्यान’ च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

YouTube player

मराठी शाळेची ओळख, तिचे वातावरण, त्यातील आपुलकी, शिक्षकांचे प्रेम आणि शाळेच्या भिंतीतून मिळालेले संस्कार हे सर्वच या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जिवंत होते. रोहित जाधव यांच्या दमदार आवाजास हर्ष–विजय यांचे संगीत आणि गीतकार ईश्वर अंधारे यांच्या मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळतो. हे गाणं प्रत्येकाला नॉस्टॅलजिक करणारे आहे.

गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ”’क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचे वास्तव, त्यांची जिद्द आणि त्यांच्यातील ऊर्जा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शाळा मराठी’ हे गाणे या चित्रपटाच्या आत्म्याला स्पर्श करणारे आहे. मराठी शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या त्यांचे संस्कार, मूल्य आणि ऊब या गीतात सजीव झाली आहे. १२ वर्षांच्या रोहित जाधवने या गाण्यात रंगत आणलीय. रोहित हा छत्रपती संभाजीनगरचा असून गुरुवर्य अनाथाची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या कीर्तन संस्थेत तो गेली सहा वर्षं शिक्षण घेत आहे. एका छोट्या गावचा चिमुकला किर्तनकार या गाण्यातून त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा मला फार आनंद आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला हे माझे विनम्र अभिवादन आहे”

संगीतकार हर्ष–विजय म्हणतात, ” ‘शाळा मराठी’ हे गाणं करताना आम्हालाही पुन्हा एकदा आपल्या शाळेत गेल्यासारखे वाटले. मातृभाषेची आपुलकी, शिक्षकांचा स्पर्श आणि बालपणाची ऊर्जा आम्ही संगीतामध्ये जाणवून दिली आहे. हे गाणे ऐकताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील आणि हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. आमचा हा पहिला चित्रपट आहे व या गाण्याचा प्रवास खूप अनोखा होता. हे गाणे करताना आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे आम्ही आभारी आहोत; त्यांनी आम्हाला ही संधी दिली.”

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, निर्मिती क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळीची, तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *