‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित
सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!
केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकायला नाही, तर पाहायला आणि अनुभवायला देखील मजेदार आहे. चित्रपटाचा एकूण मूड, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा समतोल हे गाणे सुरुवातीलाच ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.
या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. कुणाल-करण यांचे संगीत हे या गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की, ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहाते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते. ठेका, शब्द आणि सूर यांचा ताळमेळ गाण्याला अधिक खुसखुशीत आणि रंगतदार बनवतो.
गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून त्यांच्या शब्दांतून सासू-सुनेच्या नात्यातील खट्याळपणा आणि आपुलकी सहजपणे उमटते. साधे, बोलके आणि लक्षात राहाणारे शब्द गाण्याला अधिक प्रभावी बनवतात. गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत कमाल दिसत असून त्यांची धमाल केमिस्ट्री आणि सहज अभिनय गाण्याच्या मस्तीला आणखी उठाव देतो. एकूणच हे गाणे ऐकायला जितके मजेदार आहे, तितकेच त्याचे सादरीकरणही लक्षवेधी ठरते.

गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ‘’सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल आणि प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात ते वाजेल, याची मला खात्री आहे.”
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून, छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
