EntertainmentMarathi

हास्यसम्राटांची तिकडी परत! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टर पाहाताच एक गोष्ट स्पष्ट होते ती, या वेळी गोंधळ डबल आहे… आणि धमालही डबल! साध्या परिस्थितीतून मोठा गोंधळ निर्माण करणारी ‘साडे माडे तीन’ची ओळख या नव्या पोस्टरमधूनही ठळकपणे जाणवते आणि त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘साडे माडे तीन’चा पहिला भाग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला. विशेष म्हणजे, या अविस्मरणीय पहिल्या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केलं होतं. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेले अंकुश चौधरी दिग्दर्शक म्हणूनही तितकेच सक्षम आणि संवेदनशील असल्याचं त्यांनी अनेक चित्रपटांतून सिद्ध केलं आहे. मनोरंजन आणि कथन यांचा अचूक समतोल साधणारी त्यांची दिग्दर्शकीय हातोटीच ‘साडे माडे तीन’च्या यशामागचं मोठं बळ ठरली होती.

आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी जुळवून घेत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येतोय.

निर्मात्या उषा काकडे म्हणतात, ‘’हा चित्रपट म्हणजे केवळ पुढचा भाग नाही, तर प्रेक्षकांच्या आठवणींवरची प्रेमाची फुंकर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून आणि मनापासून केली आहे.”

निर्माते अमेय खोपकर सांगतात, ‘’पहिला चित्रपट पाहून मोठा झालेला प्रेक्षक आणि आजचा तरुण प्रेक्षक दोघांनाही एकत्र हसवणं, हीच आमची खरी परीक्षा होती आणि मला खात्री आहे, यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’

तर निर्माते पुष्कर यावलकर म्हणतात, “आजच्या धावपळीच्या आयुष्यात दोन-अडीच तास मनमुराद हसता आलं, तर त्याहून मोठं यश नाही.”

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

 

 

By Sunder 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *