EntertainmentMarathi

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने आयोजित २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी(IAS), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश मगदूम, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, ज्युरी मेंबर सुप्रतिम भोल, सतीश जकातदार, प्रेमानंद मुजुमदार, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात आला आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

हॉलिवूड चित्रपट आपल्या सहज पाहता येतात. आपल्या शेजारी असलेले आशियाई देशातले चित्रपट आपण या महोत्सवादरम्यान पाहतो. आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते असं सांगत, महोत्सवातील अनेक उत्तम जागतिक चित्रपट पाहण्याचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा असे दिग्दर्शिका सई परांजपे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक चांगल्या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. सिनेप्रेमी आणि माझ्यासाठी ही आनंददायी गोष्ट असून या महोत्सवाचा भाग होऊन आपण सगळ्यांनी एक हा महोत्सव यशस्वी करूया आणि जगभरातल्या चित्रपटांचा बघण्याचा आनंद एकत्रितपणे साजरा करू अशाशुभेच्छा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश मगदूम यांनी याप्रसंगी दिल्या.

शासनाने वेगवेगळ्या कलांबद्दल तसेच चित्रपटाबद्दल काय करायला हवे हे सांगू पाहणाऱ्या अनेक कलासक्त मंडळीनी पुढे येऊन आपले विचार मांडायला हवेत. त्यासाठी अवश्य ते सहकार्य करण्याची तयारी आम्ही दाखवू. या महोत्सवाप्रमाणे शासनाने अनेक चांगल्या कलात्मक गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवला असून तो सकारात्मक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णीयांनी यावेळी केले अशा महोत्सवांमुळे जगभरातल्या अनेक उत्तम कलाकृतीं पाहायला मिळातात एकत्र येण्याने उत्तम नेटवर्किंग होत असतं. तसेच जगभरात कशापद्धतीने कलांकडे पहिले जाते याचा एक दृष्टिकोन मिळत असतो तो फार महत्त्वाचा असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

भारतीय सिनेसृष्टीतील सक्षम विचारसरणीची आणि वेगळ्या धाटणीची दिग्दर्शिका सई परांजपे यांनी आपल्या अनोख्या शैलीतून सिनेमाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा या मंचावर होणारा गौरव आणि त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान यासाठी आम्ही खरंच कायम कृतज्ञ असू असं सांगत या महोत्सवला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त यावर्षीपासून उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याची घोषणा तसेच चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्यावरील चित्रपटाची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी यावेळी केली.

यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. १५जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

 

By Sunder 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *