EntertainmentMarathi

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पहायला मिळणार आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘केस नं. ७३’ या चित्रपटात एसपी संजय देशमुख ही जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते शैलेश दातार साकारणार आहेत.

एसपी म्हणून संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याच्या पूर्ण सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय गावात लोकप्रिय आहे. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर आहे. धागेदोरे मिळत नाहीत आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे.

लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.

जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. एकामागोमाग होणाऱ्या खूनाचा आणि त्यामागच्या गुन्हेगाराचा मागोवा घेताना निर्माण होणारं गूढ ‘केस नं. ७३’ चित्रपटात पहाता येणार आहे. स्टोरीमधील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *