मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता, रतनचा ताठर स्वभाव आणि बबनचा खोडकरपणा प्रेक्षकांच्या मनात घर करत असतानाच आता या चित्रपटातील एक खास सरप्राईज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले एआय प्रमोशनल साँग!

गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला विक्रम हिरनाईक यांनी शब्दबद्ध केले आहे. या खास गाण्याला अवधूत गुप्ते यांनी आवाज दिला असून ऐकायला जितके भन्नाट, तितकेच पाहायलाही हे गाणे जबरदस्त ठरत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रपटातील कलाकारांना नव्या, गोंडस आणि कल्पनारम्य रूपात सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुरळे ब्रदर्सचा साधेपणा आणि निरागसता एआयच्या माध्यमातून आणखी खुलून दिसत आहे. प्रेक्षकांना हा वेगळा प्रयोग खूपच भावत आहे.
एआयमधील या गाण्याची संकल्पना आणि सादरीकरणाची जबाबदारी ईओडी मीडियाच्या पुष्कर आणि रश्मी यांनी समर्थपणे पेलली आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे क्लिप्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून रील्स, स्टेटस आणि कमेंट्समध्ये या गाण्याचीच चर्चा रंगली आहे. “मराठीतही असा प्रयोग होऊ शकतो याचा अभिमान वाटतो”, “एआयमधील कलाकार खूपच क्यूट दिसत आहेत”, “गाणं पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
चित्रपटाची लोकप्रियता आणि या एआय गाण्याचा ट्रेंड यामुळे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची क्रेझ आणखी वाढली आहे. विनोदाचा ठसका आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे हा चित्रपट आता वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला गअसून यात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स आणि ईओडी मीडिया निर्मित, तसेच अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे.
उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.
By Sunder
