EntertainmentMarathi

फिल्मफेअर विजेता अभिनेता धैर्य घोलपची बहिण चालवतेय वडिलांची लीगसी

येक नंबर, तानाजी या चित्रपटांमध्ये झळकलेला मराठमोळा अभिनेता घैर्य घोलप सध्या चर्चेत आला आहे. धैर्यच्या लाडक्या बहिणीने मानाच्या फोर्ब्स इंडिया २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान मिळवलं आहे. तसेच धैर्यला ही त्याच्या येक नंबर या त्याच्या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी ‘फिल्म फेअर’ अवार्ड मिळालं. त्याने त्याच्या बहिणीसाठी सोशल मीडियावर नुकतीच भावूक पोस्ट शेअर केली आहे.

त्या पोस्टमध्ये धैर्यने लिहिलय की, “फोर्ब्स ४० अंडर ४० च्या प्रतिष्ठित लिस्ट मधे माझ्या बहिणीचं नाव झळकलं व पुरस्कार घरी आला आणि माझ्या डोळ्यासमोरून इतक्या वर्षांचा फ्लॅशबॅक गेला. माझे बाबा बोर्डात आले होते त्यामुळे साहजिकपणे त्यांच्या माफक अपेक्षा अश्या होत्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात कधी मागे पडू नये. त्यामुळे ते आमच्या लहानपणापासून आम्हाला जमेल त्या पद्धतीने अभ्यासात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. त्यात आमची ताई कायम त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायची आणि पुस्तकांमध्ये हरवलेली असायची. (आजदेखील तसंच चित्र आहे म्हणा) आम्ही शाळा-कॉलेज मध्ये असताना बाबा सकाळी ५ वाजता उठायचे आम्हाला ड्रायफ्रूट्स आणि गरम दूध करून ठेवायचे मग आम्हाला उठवायचे आणि अभ्यासाला बसवायचे आणि मग ऑफिस ला जायचे. एखाद्या गोष्टीची तपश्चर्या आणि कठोर मेहनत करत नाही तोपर्यंत यश साध्य होणे नाही. जे करायचं आहे ते प्रचंड प्रामाणिकपणे करा . जीव तोडून मेहनत केली तर सगळं साध्य होऊ शकतं होत नाही, जमत नाही म्हणजे काय ? लात मारीन तिथे पाणी काढीन असं असावं. हि त्यांची शिकवण होती. ताईला तेंव्हा च कळालं होतं हे त्यामुळे तिने नंबरात येणं कधी सोडलं नाही.ती बिचारी मन लावून इंग्रजी, गणित, विज्ञान असे कठीण विषय बाबांकडून शिकत देखील बसायची . तेव्हा मला ते दंगल मधल्या आमीर खान सारखे वाटायचे आणि ते माझ्याकडे तारे जमीन पर मधल्या इशान अवस्थी सारखे बघायचे. फारच अविस्मरणीय आणि गमतीशीर दिवस होते ते.”

पुढे त्याने लिहिलय, “ह्या सगळ्या शिकवणीचा अर्थ वय वाढत गेलं तसा उलगडायला लागला क्षेत्र कोणतं का असेना यश मिळवायचंय तर तपश्चर्येला पर्याय नाही. आज आम्ही दोघेही भावंडं त्यांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवून आपापल्या क्षेत्रात मेहनतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत यश मिळो वा अपयश प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे सुरू असतात. आई म्हणत होती मुलाला पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाला आणि आता मुलीला फोर्ब्स च्या टॉप ४० अंडर ४० मधे मान आज बाबा जाऊन १५ वर्ष झाली. ते आज असते तर त्यांना हे चित्र पाहून अतिशय आनंद झाला असता. तर माझ्या आई बाबांसारखाच मलादेखील माझ्या बहिणीचा प्रचंड अभिमान आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.”

Link : https://www.instagram.com/p/DVEHTYCCFNV/?igsh=MTg0aWJ1M3B5NzV0eA==

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *