ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट
ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहाण्यासाठी नागरिकांना शहरांवर अवलंबून राहावे लागते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत थेट नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे भव्य लोकार्पण नुकतेच मुंबईत पार पडले. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिनेसृष्टीतील दीपक तिजोरी, दिग्दर्शक अभिजीत पानसे, विजू माने, समीर विद्वांस, आशिष बेंडे, सुबोध खानोलकर, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश सादर करण्यात आला. तसेच या सोहळ्यात ‘किस्सा शुरू टॉकीज’ चा विस्तार महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये करण्याची घोषणाही करण्यात आली.
‘किस्सा शुरू टॉकीज’ होम सिनेमा हे एचडीएमआय आधारित आधुनिक उपकरण असून ते थेट टीव्हीला जोडता येते. या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रेक्षकांना थिएटरमध्ये न जाता घरबसल्या नवीन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपट निर्माते आपले चित्रपट केएसटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार असून दर शुक्रवारी नवीन चित्रपट या डिव्हाईसमध्ये डाऊनलोड होणार आहेत. प्रेक्षकांना आपल्या पसंतीचा चित्रपट केवळ ९९ रुपये शुल्क भरून पाहाता येणार असल्याने ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी हा एक परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.
या उपकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केएसटीने विकसित केलेले दोन पेटंट-पेंडिंग तंत्रज्ञान. ‘फॅमिली सेफ मोड’, ज्याद्वारे कुटुंबाला सुरक्षित व वयानुरूप चित्रपट अनुभव नियंत्रित करता येईल आणि ‘निर्माता-ते-थेट-प्रेक्षक व्हिडिओ कॉल’ प्रणाली, ज्याद्वारे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक थेट गावोगावच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकतात. चित्रपटांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक डीआरएम व फॉरेन्सिक वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचाही यात समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान ‘किस्सा शुरू टॉकीज’ शी संलग्न होणाऱ्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या नव्या माध्यमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामीण प्रेक्षकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना संस्थापक संतोष बिराजदार, अभिषेक जठार आणि शिरीष शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये चित्रपटगृहे नसल्यामुळे ग्रामीण प्रेक्षक नव्या चित्रपटांपासून वंचित राहातात. हीच गरज ओळखून ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा पर्याय निर्माण करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार मनोरंजन पोहोचवण्यासोबतच मराठी चित्रपटांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे.’’
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणतात, ‘’मराठी तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या ‘किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा’ या उपक्रमामागची संकल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण आणि काळाची गरज ओळखणारी आहे. ‘आपल्या घरचा चित्रपट’ ही भावना जपत, चित्रपट प्रदर्शित होतानाच तो गावागावांत आणि थेट घराघरांत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः मराठी चित्रपटाचे प्रेक्षक आणि प्रदर्शनाची व्याप्ती वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून राबवला जाणारा हा अभिनव प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा मला विश्वास आहे. मराठी चित्रपटाला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत आणि नव्या पिढीपर्यंत तो अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमासाठी या संपूर्ण टीमला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर म्हणतात, “महाराष्ट्रातील अनेक तालुका आणि ग्रामीण भाग आजही चित्रपटगृहांच्या सुविधेपासून वंचित आहेत. अनेक प्रेक्षकांना एक चित्रपट पाहाण्यासाठी ५० किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागतो. अशा ठिकाणी चित्रपट पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद आहे. ही संधी ग्रामीण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून त्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे माझे आवाहन आहे. दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक या तिन्ही घटकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे. संतोष बिराजदार माझा जुना साथी आहे त्याला आणि त्याच्या टीमला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
By Sunder
