समर्थ’ चित्रपटाच्या संगीताचा दिमाखदार सोहळा पुण्यात संपन्न!
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात समर्थ रामदास स्वामींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेल्या आगामी ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाच्या संगीताचा दिमाखदार अनावरण सोहळा नुकताच पुण्यातील चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भक्तिमय वातावरण, सुरेल गीतांची मैफल, कलाकारांचे मनोगत आणि चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास उलगडणाऱ्या दिलखुलास संवादांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांच्या स्वरातील चित्रपटातील भव्य प्रार्थनेच्या विशेष दृश्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर चित्रपटाच्या संगीताचे अधिकृत अनावरण करण्यात आले. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी आपल्या ओघवत्या आणि खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी चित्रपटातील गीते सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यशैलीत सादर केलेल्या विशेष नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. समारोपावेळी शंकर महादेवन यांच्या प्रार्थनेवर शर्वरी जमेनीस यांच्या नृत्यसंस्थेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भव्य नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या संगीत सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपटातील प्रत्येक गीतामागील संकल्पना, दिग्दर्शकाची दृष्टी, निर्मात्यांचा विचार, गीतलेखन, संगीतनिर्मिती आणि गायनाचा प्रवास यावर कलाकार, गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्याशी रंगलेल्या दिलखुलास गप्पा. या संवादांमधून प्रेक्षकांना चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची एक वेगळी आणि प्रेरणादायी झलक अनुभवायला मिळाली.
चित्रपटाचे संगीत ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित आणि युवा संगीतकार-गायक रोहित राऊत यांनी दिले आहे. चित्रपटातील सात गीतांपैकी पाच गीतांना केदार पंडित, तर दोन गीतांना रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे. गीतकार नचिकेत जोग यांनी चार गीते लिहिली असून मंदार चोळकर आणि रोहित राऊत यांनी प्रत्येकी एक गीत लिहिले आहे. समर्थ रामदास स्वामी आणि वेण्णास्वामी यांच्या पारंपरिक रचनांचाही चित्रपटात प्रभावी वापर करण्यात आला आहे.
दिग्दर्शक यावेळी दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आजच्या काळाशी जोडणारा एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास आहे. या चित्रपटाचं मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम. जसा हा मेळ चित्रपटाच्या कथेत अनुभवायला मिळतो, तसाच तो संगीतामध्येही प्रकर्षाने जाणवतो. प्रत्येक गीत हे कथेला पुढे नेणारे आणि पात्रांच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करणारे आहे. संगीत अनावरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी या प्रवासाची पहिली अनुभूती घेतली असून, चित्रपट पाहिल्यानंतर या गीतांचा अर्थ आणि परिणाम त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, याची आम्हाला खात्री आहे.”
निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, “ ‘समर्थ’ हा प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून अनुभवावा, असा चित्रपट आहे. या चित्रपट संस्कार, अध्यात्म, प्रेरणा आणि नात्यांची जपणूक करणारा एक संगीतमय प्रवास आहे.”
थर्मोलाईन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाचे निर्माते, रामकथाकार, प्रवचनकार आणि उद्योजक रविंद्र पाठक असून, क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत आहेत. चित्रपटात पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस, भूषण प्रधान, ईशा केशकर, दिशा परदेशी, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, निखिल राऊत, अयान दरेकर, श्रीजय देशपांडे आणि अभिज्ञा माथवड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आध्यात्म, संस्कार, प्रेरणा आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुंदर संगम असलेला ‘समर्थ’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी भारतासह परदेशात प्रदर्शित होणार असून, चित्रपटातील सर्व गीते ‘मानस किनकर रविंद्र पाठक’ या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तसेच सर्व प्रमुख डिजिटल संगीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
By Sunder
