मराठमोळ्या साजशृंगाराने सजला ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभली दिमाखदार रंगत
महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी मराठमोळ्या साजशृंगाराची, पारंपरिक वेशभूषेची आणि आत्मविश्वासाची मनमोहक झलक सादर करत ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’ मध्ये रंगत आणली. पारंपरिक मराठी संस्कृती, वेशभूषा आणि आधुनिक फॅशन यांचा सुरेख मिलाफ या दिमाखदार सोहळ्यात अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे लहान मुलांपासून महिला आणि पुरुषांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि कलागुणांची छाप उमटवली. ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली काळे, सागर सकट आणि अभिनंदन गायकवाड यांनी केले होते.
या कार्यक्रमाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती लाभली. अभिनेता सागर कारंडे, रेशम टिपणीस, अनिकेत विश्वासराव, विशाल कोटियन, वीणा जगताप, हेमा शर्मा, चिन्मय उदगीरकर, अभिजीत बिचुकले, हर्षद अतकरी आणि प्रियांका खोलगडे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमुळे या फॅशन शोला मनोरंजनाची आणि ग्लॅमरची विशेष जोड मिळाली.
बालगटात ‘मराठमोळा’चा जल्लोष
४ ते ८ वर्षे वयोगटातील ‘मराठमोळा’ स्पर्धेत बालकलाकारांनी आपल्या निरागसपणासोबतच आत्मविश्वास आणि स्टेज प्रेझेन्सने उपस्थितांची मने जिंकली. या गटात शौर्य (७ वर्षे), सानिका सावळे (८ वर्षे), अदिरा गाडे आणि सुमन विसपुते यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सुमन विसपुते यांना ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ हा विशेष पुरस्कार मिळाला. तर अद्विक ज्युनियर शिवाजी महाराज याला ‘मिस्टर ज्युनियर मराठमोळा’ हा किताब देण्यात आला.
९ ते १४ वर्षे वयोगटातही स्पर्धकांनी आपल्या आत्मविश्वासाने आणि आकर्षक सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. या गटात आराध्या हिने विजेतेपद पटकावले, तर शैश मोरे प्रथम उपविजेता आणि पृथ्वीराज साळुंके द्वितीय उपविजेता ठरले. धृणा मुलचंदानी हिला ‘बेस्ट स्माईल’, तर काव्या कदम हिला ‘बेस्ट वॉक’ या विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
‘Mrs.’ विभागात महिलांचा आत्मविश्वास ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
‘Mrs.’ विभागात महिलांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेसोबतच आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि स्टेज प्रेझेन्सचे प्रभावी दर्शन घडवले. हिंदवी चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. Mrs. मोनाली कांबळे या प्रथम उपविजेत्या, तर रितू निचानी या द्वितीय उपविजेत्या ठरल्या.
‘Miss’ विभागात तरुणाईचा उत्साह
‘Miss’ विभागातही स्पर्धकांनी आपल्या सौंदर्याबरोबरच आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली. गौरी चव्हाण हिने विजेतेपद पटकावले. मिनल मून हिने प्रथम उपविजेतेपद, तर डॉ. ऐश्वर्या दळवी हिने द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
पुरूष विभागात निखिल जगध विजेता
पुरूष विभागात निखिल जगधने याने आपल्या प्रभावी सादरीकरणातून विजेतेपद पटकावले. पियुष राजपूत प्रथम उपविजेता ठरला. सैफ अली खान आणि यश वायफळकर यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
‘मराठमोळा फॅशन शो २०२६’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतील साजशृंगार, पारंपरिक वेशभूषा आणि मराठीपणाचा अभिमान प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. विविध वयोगटातील स्पर्धकांना आपले कौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास सादर करण्यासाठी या मंचाने महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली.
मराठी संस्कृती आणि कलाविश्वाला एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाला कलाकार, स्पर्धक, फॅशनप्रेमी आणि उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंपरेचा अभिमान जपत आधुनिक फॅशनविश्वाशी मराठमोळ्या संस्कृतीची सांगड घालण्याचा सुंदर प्रयत्न म्हणजे ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
By Sunder M
