Entertainment

पाकिस्तानात “धाराऊ” या मराठी चित्रपटाचा डंका, चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित

‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनसह चर्चेत आलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा अधिकृत टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनशैली, भारतीय संस्कृती आणि गोमातेप्रती असलेली श्रद्धा यांची झलक या टीझरमधून पाहायला मिळते. एका लहान मुलाचे आणि गायीचे भावनिक नाते अधोरेखित करणारा हा टीझर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला जगभरातून २६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यात आश्चर्य म्हणजे पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार मिळाल्याची माहिती दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांनी दिली. चित्रपटाच्या विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे चित्रपटाविषयी सांगतात, “मला सांगायला आनंद होत आहे की धाराऊ या माझ्या पहिल्याच मराठी चित्रपटाला जगभरातून तब्बल २६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करत असतो. कुणी गोशाळा उभारून गोपालन करतो, तर कुणी विविध माध्यमांतून जनजागृती करतो. मी चित्रपटाच्या माध्यमातून माझे योगदान देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान का दिले जाते, ती पूजनीय का मानली जाते, या भावना आणि विचार ‘धाराऊ’च्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार मिळाला, ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. पाकिस्तानसारख्या देशातही या चित्रपटाची दखल घेतली गेली आणि पुरस्काराने गौरवण्यात आले, याचा मला आनंद आहे. २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, माझ्या भावना आणि चित्रपटामागचा विचार प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल, अशी मला आशा आहे.”

‘धाराऊ’मधून गोमातेप्रती श्रद्धा, माणुसकी, ग्रामीण संस्कृती आणि भावनिक नात्यांचा वेध घेण्यात आला आहे. चित्रपटाच्या शीर्षकातूनच या नात्याची भावनिक खोली जाणवते. टीझरमधील ग्रामीण परिसर, धार्मिक स्थळांची पार्श्वभूमी आणि गायीच्या सहवासातील बालपणाची झलक कथेविषयी कुतूहल वाढवते. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केले आहे.

‘धाराऊ’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकृत टीझर आणि चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारामुळे आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

YouTube player

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *