स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर उलगडणार नात्यांचा भावस्पर्शी प्रवास ‘इरावती’ १२ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत
नाती जोडली जाणं आणि ती मनापासून जपणं, ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जन्माला आल्यापासूनच आपण काही नात्यांच्या बंधनात गुंफले जातो, तर काही नाती आयुष्याच्या प्रवासात नकळत जुळत जातात. काही नाती रक्ताची असतात, तर काही माया, प्रेम, आपुलकी आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली असतात. अशाच जिव्हाळ्याच्या नात्यांची, आपुलकीची आणित्यासोबत रहस्याची जोड असणारी गोष्ट सांगणारा ‘इरावती’ हा मराठी चित्रपट नव्या वर्षात, १२ फेब्रुवारी २०२७ ला आपल्या भेटीस येणार आहे. चिन्मय प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले असून निर्मिती डॉ. दिनेश वैद्य यांची आहे.
चित्रपटात सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांची दमदार फळी आणि नात्यांमधील भावविश्व उलगडणारी कथा यांमुळे ‘इरावती’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्माते डॉ. दिनेश वैद्य म्हणाले, ‘इरावती’ ही केवळ एक चित्रपटाची कथा नसून, माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध घेणारा अनुभव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांचं महत्त्व जाणणं अधिक गरजेचं झालं आहे. प्रेक्षकांना आपल्या आयुष्याशी जोडणारा, मनाला स्पर्श करणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा आशय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘इरावती’ प्रेक्षकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करेल, अशी आशा आहे.”
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक निलेश देशपांडे म्हणाले, “प्रत्येक नात्याला स्वतःची एक गोष्ट असते. या नात्यांमधील भावभावना, त्यात दडलेली ओढ आणि माणसांना एकमेकांशी जोडणारे अदृश्य धागे यांचा वेध ‘इरावती’मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ भावनिक अनुभव देणार नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही करून देईल, असा मला विश्वास आहे.”
‘इरावती’ चित्रपटाची कथा डॅा. दिनेश वैद्य यांची असून पटकथा नंदू परदेशी यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी डॉ. दिनेश वैद्य आणि नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत के यांनी केले असून, संकलन सुबोध नारकर यांनी केले आहे. पायलट साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे असून, कार्यकारी निर्माता म्हणून संभाजी जायेभाये यांनी काम पाहिले आहे. संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमकर यांचे आहे. मिक्सिंग इंजिनिअर म्हणून अभिजीत श्रीराम देव यांनी काम पाहिले आहे. वेशभूषा ममता मंडल आणि विदुला तामोरे यांनी केली असून, रंगभूषेची जबाबदारी सुदर्शन कुलाबकर यांनी, तर केशभूषेची जबाबदारी जयश्री नाईक यांनी सांभाळली आहे.
By Sunder M
