मैत्रीच्या नात्यात प्रेमाची हळुवार चाहूल! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ गाणं प्रदर्शित!
मैत्रीच्या नात्यातून कधी, कसं प्रेम फुलू लागतं, हे कळतही नाही. एकमेकांकडे पाहाताना नजर थोडी अधिक रेंगाळते, नकळत एकमेकांची ओढ वाटू लागते आणि मैत्रीच्या पलीकडे जाऊन एका नव्या नात्याची चाहूल लागते. प्रेमाच्या याच हळुवार भावना उलगडणारं ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘तुला पाहते’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना, एकमेकांकडे पाहाताना खुलणारे प्रेमाचे रंग आणि नव्या नात्याची गोड सुरुवात यांचं सुंदर चित्रण या गाण्यात पाहायला मिळतं.
कधी सहज होणारी नजरानजर, कधी एकमेकांकडे पाहाताना चेहऱ्यावर उमटणारं हसू, तर कधी मनातल्या भावना न बोलताच व्यक्त करणारी नजर… अशा छोट्या छोट्या क्षणांतून प्रेम फुलत असल्याचा अनुभव ‘तुला पाहते’ या गाण्यातून येतो.

संगीतकार पंकज पडघण यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याला सायली पंकज आणि शिवम सिंह यांचा सुरेल आवाज लाभला आहे. गुरू ठाकूर यांच्या शब्दांतून प्रेमाच्या या नाजूक भावना व्यक्त होतात. संगीत, शब्द आणि सुरांचा सुरेख मेळ साधणारं हे गाणं प्रेमात पडण्याच्या सुंदर क्षणांची अनुभूती देतं. गाण्यातील कलाकारांची केमिस्ट्री, सहजता आणि हळूहळू खुलत जाणाऱ्या नात्याचे भाव यामुळे गाणं अधिक लक्षवेधी ठरतं.
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “मैत्री आणि प्रेम यांच्यात एक अतिशय सुंदर सीमारेषा असते. कधी कधी आपल्याला कळतही नाही की, मैत्रीचं नातं कधी प्रेमाच्या दिशेने वाटचाल करू लागतं. एकमेकांकडे पाहाण्याची बदललेली नजर, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि नकळत निर्माण होणारी ओढ यातून प्रेम फुलत जातं. ‘तुला पाहते’ या गाण्यातून प्रेमाची हीच हळुवार सुरुवात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यातील भावना प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील अशाच सुंदर क्षणांची आठवण करून देतील, अशी आशा आहे.”
संगीतकार पंकज पडघण म्हणतात, “प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा भव्य प्रसंगांची गरज नसते. कधी एक नजर, एखादं निरागस हास्य किंवा एकमेकांच्या सहवासात घालवलेला क्षणही खूप काही सांगून जातो. ‘तुला पाहते’ या गाण्यातून प्रेमाच्या याच न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना संगीताच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं ऐकताना आणि पाहाताना प्रेक्षकांना प्रेमात पडण्याचा तो खास अनुभव पुन्हा अनुभवता येईल.”
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “प्रत्येक नात्याची सुरुवात वेगळी असते. काही नाती मैत्रीतून फुलतात, तर काहींची सुरुवात एखाद्या नजरेतून होते. ‘मैत्रेया’मध्ये तरुणाईच्या आयुष्यातील अशाच नात्यांचे विविध रंग पाहायला मिळणार आहेत. ‘तुला पाहते’ हे गाणं मैत्रीच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची चाहूल देणारं आहे. प्रेमाची हळुवार भावना, कलाकारांमधील सहज केमिस्ट्री आणि संगीताची सुंदर साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल, असा विश्वास आहे.”
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर चित्रपटाचे निर्माते असून, अमन खळतकर सहनिर्माते आहेत. या चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात फुलणाऱ्या नात्यांची गोष्ट सांगणारा ‘मैत्रेया’ येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
By Sunder M
