EntertainmentMarathi

झी स्टुडिओजच्या ‘जिजाई’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी!
घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबासाठी धडपडत प्रत्येक स्त्री रोज घराबाहेर पडते. मात्र, या प्रवासात तिच्या सुरक्षेचं, तिच्या अस्तित्वाचं, स्वाभिमानाचं काय? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की, त्याविरोधात उभं राहाण्याची ताकदही तिच्यात असते? एखादी स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करते, तेव्हा तिच्यातील उग्र रूप कसं समोर येऊ शकतं हे झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका खास कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर समाजमाध्यमावर आलेल्या या ट्रेलरमधील थरारक दृश्यांमुळे तो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

घनदाट जंगल, रात्रीचा गडद अंधार, सुनसान रस्ता, एका बसमधील प्रवास, पोलिसांचा सुरू असलेला तपास आणि रिंकूचे दमदार अॅक्शन सीन्स यामुळे ट्रेलरमध्ये एक वेगळाच थरार निर्माण होतो. या चित्रपटात रिंकू राजगुरू पहिल्यांदाच अॅक्शन भूमिकेत दिसत असून तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, तिच्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि या सगळ्यामागे कोणतं गूढ दडलं आहे, याबद्दल जिजाईच्या ट्रेलरमध्ये सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची कथेत नेमकी काय भूमिका आहे, याबद्दल ट्रेलरमध्ये पुरेशी उत्सुकता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध आणि कथेतील अनपेक्षित वळणं जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणतात, “स्त्रीचं आयुष्य केवळ तिच्या घरापुरतं किंवा तिच्या जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित नसतं. रोजच्या आयुष्यात अनेक भूमिका निभावताना तिला स्वतःसाठीही अनेक लढाया लढाव्या लागतात. ‘जिजाई’मधून आम्ही अशाच एका स्त्रीची गोष्ट मांडली आहे. तिचा संघर्ष, तिचा स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात उभं राहाण्याचा तिचा निर्णय हा या कथेचा गाभा आहे. रिंकूने ही व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने साकारली आहे.“

YouTube player

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष आणि तिच्या अस्तित्वाचा प्रश्न हा कायमच महत्त्वाचा राहिला आहे. ‘जिजाई’मधून हा विषय एका वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांसमोर येणार आहे. रिंकू राजगुरूने आपल्या अभिनयातून साकारलेली जिजाईची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला लावेल.“

झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले असून झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुपूर गुहा आणि तुषार राऊत हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गुलराज सिंग यांचे संगीत असलेल्या या चित्रपटाची गाणी सध्या विशेष गाजत आहेत. स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडणारा ‘जिजाई’ येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *