‘जिजाई’ मध्ये किशोर कदम दिसणार दमदार पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत!
नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते किशोर कदम आता झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून एका दमदार पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.
किशोर कदम यांनी आजवर केवळ मराठीच नाही तर अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटातही विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. प्रत्येक वेळी वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या भावविश्वाची व्यक्तिरेखा निवडत त्यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध केली आहे.
ते जेवढे उत्तम अभिनेते आहेत तेवढेच उत्तम कवीदेखील आहेत. त्यांच्या कविता सादर करण्याच्या शैलीत एक खास लय असते आणि तीच लय त्यांच्या संवादफेकीतसुद्धा दिसून येते. यामुळेच किशोर कदम यांच्या या शैलीचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी तर ‘जिजाई’मधील ही पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका खास पर्वणीच ठरणार आहे.
या भूमिकेविषयी किशोर कदम सांगतात, “‘जिजाई’मध्ये मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेकडे केवळ एक पोलिस इन्स्पेक्टर म्हणून पाहाता येणार नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वामागेही काही अनोखे पैलू आणि एक स्वतंत्र भावविश्व दडलेले आहे. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. या भूमिकेच्या निमित्तानेही मला एक वेगळा अनुभव घेता आला. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा नक्कीच आपलीशी वाटेल.”
दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणतात, “या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर सुरुवातीपासूनच किशोर कदम हेच होते. कोणतीही व्यक्तिरेखा ते केवळ साकारत नाहीत, तर आपल्या अभिनयातून तिला एक स्वतंत्र ओळख देतात. ‘जिजाई’मधील त्यांची भूमिका ही अत्यंत वास्तववादी आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळी उंची मिळाली आहे. त्यांच्यासारखा कसलेला अभिनेता या भूमिकेसाठी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”
स्त्रीचा संघर्ष, स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात उभे राहाण्याची तिची ताकद मांडणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत आहे. किशोर कदम यांच्यासह मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहेत. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्मची निर्मिती असलेला ‘ जिजाई ‘ येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
By Sunder M
