EntertainmentMarathi

होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित… ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘होय महाराजा’

‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…
३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘होय महाराजा’

नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘होय महाराजा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘होय महाराजा’चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली बनणाऱ्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. ‘होय महाराजा’च्या रूपात प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रथमेशची जोडी अभिनेत्री अंकिता ए. लांडे सोबत बनली आहे. याखेरीज अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी कलाकारांचाही या चित्रपटात समावेश आहे. क्राईम-कॅामेडी असलेल्या ‘होय महाराजा’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची झलक टीझरमध्ये दिसते. एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटात प्रेमकथेतील आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहायला मिळणार आहे. एका रोमांचक प्रेम कहाणीला प्रासंगिक विनोद आणि सुरेल गीत-संगीताची सुरेख किनार जोडण्यात आली आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावताना हा चित्रपट अंतर्मुखही करेल असे मत दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

संचित बेद्रे यांनी ‘होय महाराजा’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गुरु ठाकूरच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना चिनार-महेश या संगीतकार दुकलीनं संगीतबद्ध केल्या आहेत. अमेया नरे, साजन पटेल यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, कोरिओग्राफर फुलवा खामकरने नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी वासुदेव राणे यांनी केली असून, निलेश नवनाथ गावंड यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे, तर अॅक्शन दिग्दर्शन फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी केलं आहे. वेशभूषा जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *