‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित सुबोध भावे, तेजश्री प्रधान, चित्रपटाची टीम आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला भव्य प्रीमियर
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित
सुबोध भावे, तेजश्री प्रधान, चित्रपटाची टीम आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला भव्य प्रीमियर
शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला. भव्य रांगोळी, ढोलपथक असा अस्सल मराठमोळा थाट यावेळी उपस्थितांना अनुभवायला मिळाला. या दिमाखदार सोहळ्याला कलाकारांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. नाट्यगृहात या खास शोला प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला.
या नव्या उपक्रमाबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणतात, ”मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात थिएटर मिळत नाहीत. मग अशावेळी पर्याय काय ? तर नाट्यगृहे. आता नाट्यगृहांचा जेव्हा वापर होत नाही तेव्हा ती तशीच पडून असतात. त्यांची देखभाल नीट होत नाही. जर तिथे चित्रपट प्रदर्शित केले तर त्यानिमित्ताने त्यांचा वापर होईल, योग्य देखभाल होईल. लोकांना रोजगार मिळेल. अनेक गोष्टी यातून सुरु होतील. तसेच नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे तिकीट दरही कमी असतील. आता हा आम्ही पुण्यात प्रयोग केला आहे. इतर अनेक ठिकाणी आम्हाला असे करायचे आहे. यातून आम्हाला साधारण कल्पना आली की नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काय काय जरुरी असते, ही दखल आम्ही नक्कीच घेऊ.”
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “आमचा हा पहिलाच प्रयोग होता आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा निश्चितच एक आव्हानात्मक निर्णय होता परंतु प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले. यातील कमतरता भरून काढून आम्ही आमचा हा उपक्रम इतर ठिकाणीही नक्कीच राबवू. या निमित्ताने स्वस्त दरात प्रेक्षकांना एका चांगल्या कलाकृतीचा अनुभव घेता येईल.”
निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, ” नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा प्रयोग अनेक मान्यवरांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. जर चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक त्यावर प्रेम करणारच. आज असंख्य प्रेक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. मला खात्री आहे, पुढेही चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळेल.”
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात प्रेक्षकांना आजच्या तरुणाईचे लग्नाबाबतचे विचार दाखवण्यात आले आहे. ज्यात धमाल, मजामस्ती आहेच याव्यतिरिक्त यातील काही गोष्टी भावनिकरित्या गुंतुवून ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका असून आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.
By Sunder M