‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रफिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू – रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपट जगतात लेखकांना त्यांचा योग्य तो मान व दाम मिळणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवे असं मत त्यांनी याप्रसंगी मांडलं. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते . आपल्याकडे चित्रपटांमध्ये गीत- संगीताला जर महत्त्व दिलं तर आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल असे मत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. शोले , जंजीर, दिवार यांसारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. गीतकार, पटकथाकार आणि कवी म्हणून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की, अनेक उत्तम उपक्रम फिल्मसिटी राबवत असते. त्या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक चित्रकर्त्यानी घ्यावा. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या सारख्या महान कलाकारासोबत व्यासपीठ शेअर करायला मिळणं हे खरंच भाग्याचं आहे. उत्तम सुविधा निर्माण करत ‘फिल्मसिटी’ ला जागतिक ‘प्रोडक्शन हब’ बनवण्याचा आमचा मानस आहे. त्याकरिता ‘कलासेतू’ हा उपक्रम शासनाने सुरु केला असून त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा.
दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे हे २१ वर्ष असून सातत्याने सुरु असणारा हा महोत्सव २५ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करत चित्रपट रसिकांना उत्तम चित्रपट पाहण्याची संधी देत राहील असा विश्वास महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी यावेळी बोलून दाखविला. २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक उत्तम जागतिक चित्रपट पाहण्याचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा असे सांगताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. स्क्रिनिंग कमिटी मेंबर संदीप मांजरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार मानले.
By Sunder M