गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ ‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित
गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’
‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित
‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गाण्यातील तिच्या ठसकेबाज नखऱ्याने सोशल मीडियावर आग लावली आहे, असं म्हणायला हरकत नाही. गौतमी पाटीलचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना थिरकायला लावत आहे. गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत. आकर्षक सादरीकरण आणि उत्साही संगीताने हे गाणे सध्या सर्वत्र हिट ठरत आहे.

‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी असून, त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणातात, ‘’ महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी हा गंभीर चित्रपट नाही. यात मनोरंजनही आहे. हे आयटम साँग ही कथेची गरज होती आणि या नृत्यासाठी गौतमी पाटीलाशिवाय कोणीही पर्याय असूच शकत नाही. या गाण्याचे उज्जैनमध्ये ४ डिग्री सेल्सिअसमध्ये चित्रीकरण झाले. गौतमीने एवढ्या थंडीत, अगदी काही तासांत नृत्याचा सराव करत इतके बहारदार नृत्य सादर केले. यातून तिचे कामाप्रती असलेले प्रेम आणि व्यावसायिकता दिसते. गौतमीची अदाकारी, वैशाली सामंत यांचा ठसकेदार आवाज, गाण्याचे बोल आणि संगीत या सगळ्यानेच हे गाणे कमाल बनले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे सध्या गाजतेय, याचा आनंद आहे.’’
निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात, ‘’ हे गाणे चित्रपटात एक वेगळीच रंगत आणणारे आहे. गाण्याची टीमही जबरदस्त असल्याने या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. ‘’
ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे.
By Sunder M