EntertainmentMarathi

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो ने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आपल्या भारावून टाकणाऱ्या कीर्तनाने या सगळ्या कीर्तनकारांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं.यात सहभागी सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तन सादरीकरणाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तमोत्तम कीर्तनकारांमधून सहा सर्वोत्तम कीर्तनकार स्पर्धकांनी आता अंतिम फेरी गाठली आहे.

हरिनामाचा गजर करीत दर्शनासाठी आतुरलेला वारकरी आणि लाखोंच्या संख्येने होणारा टाळमृदंगाचा नाद अशा भक्तिमय वातावरणात गेली कित्येक वर्षे पंढरपूरची वारी अविरतपणे सुरू आहे. कीर्तनातून संतवाणी ऐकण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने वारक-यांना मिळते. यंदा हीच संधी प्रेक्षकांना घरबसल्या सोनी मराठी वाहिनीमुळे मिळणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा अंतिम सोहळा येत्या ६ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार आहे.

सहा स्पर्धकांमध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. अप्रतिम कीर्तन सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या पहिले कीर्तन रत्न – ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, दुसरे कीर्तन रत्न – ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे , तिसरे कीर्तन रत्न – ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, चौथे कीर्तन रत्न- ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, पाचवे कीर्तन रत्न- ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, सहावे कीर्तन रत्न- ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे या सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार ६ जुलैला हा अंतिम सोहळा सकाळी ८.०० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने उत्तम प्रतिभा आणि गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सोनी मराठी वाहिनीने कायमच अभिनव अशा प्रकारच्या संकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो ही त्याचाच एक भाग होता. सोनी मराठी वाहिनीच्या या अभिनव संकल्पनेला कीर्तनकार स्पर्धकांनी, परीक्षकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी तितकीच उत्तम साथ दिली.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *