EntertainmentMarathi

‘पालतू फालतू’ मध्ये झळकतेय सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांसाठी एक भन्नाट, गंमतीशीर अनुभव घेऊन आलं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं लग्नानंतरच्या परिस्थितीचा आरसा दाखवणारं आहे. सुबोध भावेच्या मनातील वैताग, गोंधळ आणि त्याच्या प्रतिक्रियांचा एक मिश्कील कोलाज या गाण्यातून मांडण्यात आला आहे. हे विनोदी गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या आवाजात रंगलेलं असून ह्या गाण्याचे बोल संजय अमर आणि साजन पटेल यांनी लिहिलं असून अमेय नरे व साजन पटेल यांचं खटकेबाज संगीत ‘पालतू फालतू’ या गाण्याला लाभलं आहे.

गाण्याविषयी दिग्दर्शक संजय अमर म्हणाले, ” ‘पालतू फालतू’ हे गाणं प्रत्येक नवऱ्याच्या मनातील हक्काच्या बडबडीचं प्रतिनिधित्व करतं. सुबोध आणि रिंकूने या दृश्यांना ज्या सहजतेने जिवंत केलं, ते खरंच बघण्यासारखं आहे.हे एक गंमतीशीर गाणं आहे.”

तर निर्माता रजत अग्रवाल म्हणतात, ”या गाण्यातून प्रेक्षकांना लग्नानंतरच्या नात्याची गंमतीशीर बाजू पाहायला मिळते. आजच्या तरुण प्रेक्षकांना ही शैली स्वतःशी मिळतीजुळती वाटू शकते आणि म्हणूनच हा चित्रपटही त्यांना जोडून ठेवेल.”

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल आहेत. साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत, तसेच सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका या सिनेमाला एक वेगळीच उंची देतात. गूढ, विनोद आणि प्रेमाचा अफलातून मेळ असलेल्या ‘बेटर-हाफची लव्हस्टोरीचा टिझर आधीच चर्चेत आला असून आता हे गाणं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

YouTube player

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *