अक्षर कोठारी झळकणार ‘परिणती’ मध्ये!
आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता अक्षर कोठारी आता एका वेगळ्या रूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विविध मालिकांमधून लोकप्रियता मिळवलेला अक्षर, आता ‘परिणती’ या आगामी चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, अक्षरच्या संवेदनशील नजरेतून झळकणारी ही झलक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटात अक्षरसोबत सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या भूमिकेबद्दल अक्षर कोठारी म्हणतो, ” ‘परिणती’ माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर एक अनुभव आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा त्या पात्राच्या खोलात जाण्याची आणि त्याचा प्रवास अनुभवण्याची खूप तीव्र इच्छा झाली. अमृता आणि सोनालीसोबत काम करणं ही एक मोठी शाळा होती. या चित्रपटाने मला कलाकार म्हणून अधिक समृद्ध केलं आहे.”
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, “‘परिणती’ ही दोन स्त्रियांभोवती फिरणारी गोष्ट असली, तरी ती आपल्या सर्वांच्या आतल्या लढ्यांची, शोधांची कहाणी आहे. दोन परस्परभिन्न स्त्रिया एका वळणावर एकमेकींच्या आयुष्यात येतात आणि त्यांच्या नात्यातून एक नवा अध्याय सुरू होतो. सोनाली आणि अमृता यांसह अक्षरने ही त्याच्या भूमिकेला एक वेगळी उंची दिली आहे.”
पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, रुही माने, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन हे सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत. अक्षय बाळसराफ यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
By Sunder M