Uncategorized

‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी,क्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित

एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे आहेत. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रवास १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य आणि त्यात लपलेला गूढपणा अंगावर काटा आणणारा आहे. यातील हार्दिक जोशी चा लूक विशेष लक्ष वेधून घेतो. डोळ्यांमध्ये प्रखर राग आणि निर्धार, चेहरा कपड्याने झाकलेला आणि पार्श्वभूमीला जंगलातील गूढ वातावरण. त्याच्या नजरेतून एक भयंकर संघर्ष आणि दडलेली कहाणी जाणवते.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, ‘अरण्य’ ही फक्त जंगलाची कथा नाही, तर ही मानवी अस्तित्व, निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि संघर्षाच्या काठावर उभ्या राहिलेल्या माणसाची कहाणी आहे. या अरण्यात फक्त झाडं, पाने किंवा वेली नाहीत, तर येथे श्वास घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास आहे. कधी शांत, कधी रक्तरंजित. मला हवं होतं की प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध, त्यातील ओलसरपणा, आणि त्याच्या प्रत्येक सावलीतील रहस्य अनुभवावं. ‘अरण्य’ प्रेक्षकांना आतून जगायला लावेल.’’

निर्माते शरद पाटील म्हणतात, ‘’आजच्या सिनेमात तंत्रज्ञान, थरार आणि भावना यांचा सुंदर संगम दुर्मीळ झाला आहे. ‘अरण्य’करताना आम्ही ठरवलं होतं की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहावा. तो अनुभवावा. ‘अरण्य’ म्हणजे निसर्गाशी असलेल्या आपल्याच नात्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक भावनेतून आम्ही एक सत्य सांगत आहोत, जे दडलेलं आहे परंतु दुर्लक्षित नाही. आम्हाला खात्री आहे की, ‘अरण्य’ प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसा उमटवेल.’’

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *