सोनू निगमच्या सुरेल आवाजात अनुभवायला मिळणार ‘तूच आहे’
बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील ‘तूच आहे’ हे भावस्पर्शी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजात सादर झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गीतात प्रेम, विरह आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गाण्याचे भावपूर्ण बोल गीतकार संजय अमर यांनी लिहिले असून, ते थेट मनाच्या खोलवर जाऊन भिडतात. तर या गाण्याला साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले असून, त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयाने गाण्याची ताकद अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, ” ‘तूच आहे’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी जाणवलेली वेदना, ओढ आणि एकटेपणाचा भावनिक प्रवास उलगडणारे गाणे आहे. सुबोध भावे यांचा अभिनय आणि सोनू निगम यांचा आवाज ही या गाण्याची खरी बाजू आहे.”
निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “या गाण्यात चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक क्षण सादर केला आहे. त्यातही सोनू निगम यांच्यासारख्या दिग्गज गायकाचा सहभाग आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतील. विनोद आणि प्रेमाचा अद्वितीय मेळ असलेल्या या सिनेमाचा टिझर आधीच चर्चेत आला होता आणि आता ‘तूच आहे’ गाण्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
By Sunder M