नात्यांच्या संघर्षाची कथा उलगडणार ‘अरण्य’ उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
गडचिरोलीच्या जंगलाचा विचार केला की, मनात दाट हिरवाई, अरण्याची भीतीदायक शांतता आणि तिथे दडलेला संघर्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. या जंगलात अनेक कथा जन्माला येतात. काही भयावह, काही हृदयाला भिडणाऱ्या. याच पार्श्वभूमीवर आता मोठ्या पडद्यावर एक नवी कहाणी येत आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट प्रेक्षकांना जंगलाच्या कठीण वास्तवाशी तसेच मानवी नात्यांच्या गुंतागुंतीशी समोरासमोर आणणार असून या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात हार्दिक जोशीची दमदार उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेतेय.

टिझरच्या सुरुवातीलाच त्याने ‘जंगलचा वाघ’ म्हणून स्वतःला संबोधले आहे. ‘बंदूक हीच माझी ओळख आहे’, असे तो ठामपणे बोलताना दिसतो आणि त्यामुळे तो नक्षलवादी असल्याचे स्पष्ट होते. मात्र त्याच्या आयुष्यात मुलगी आल्यावर सर्वकाही बदलल्याचेही तो बोलत आहे. पुढे टिझरमध्ये त्याच्या मुलीच्या हातातही बंदूक दिसत असून, ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवते का, की या कारणामुळे कुटूंब जंगल सोडून जाणार, हा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नांची उकल येत्या १९ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर होणार आहे.
एस एस स्टुडिओ निर्मित, अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शरद पाटील आणि अंजली पाटील निर्माते आहेत. गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष चित्रित झाल्यामुळे चित्रपटात प्रेक्षकांना अस्सल विदर्भी लहेजा आणि वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, ”’अरण्य’ ही केवळ एका नक्षलवाद्याची कथा नाही, तर नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील संघर्षाचे वास्तव दर्शन घडवणारी कहाणी आहे. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्ष गडचिरोलीच्या जंगलात केले असून तेथील वातावरणाने या कथेला अधिक प्रामाणिकपणा दिला आहे. कलाकारांनी भूमिकेत जीव ओतून काम केले असून त्यांची केमिस्त्री प्रेक्षकांना भावेल, असा मला विश्वास आहे.”
निर्माता शरद पाटील म्हणाले, ”अरण्य’ची खासियत म्हणजे त्याची मांडणी आणि अस्सलपणा. हा केवळ अॅक्शन वा ड्रामा चित्रपट नाही, तर जीवनातल्या नात्यांच्या प्रश्नांना भिडवणारी कथा आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या वातावरणासोबत एक वेगळी संवेदना अनुभवायला मिळेल. म्हणूनच हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावा, असे आम्हाला मनापासून वाटते.”
By Sunder M