EntertainmentMarathi

शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा

छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘
शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात १९ फेब्रुवारी २०२६ ला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे नाव आहे..‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल माध्यमातून या भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच्या जोरावर धूळ चारली. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा या भव्य चित्रपटातून शिवचरित्रातील हा थरारक अध्याय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आणि विपुल अगरवाल, जेनील परमार (मुगाफी) चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तन्शा बत्रा (मुगाफी) आहेत.

असामान्य दूरदृष्टी, असीम धैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कालातीत आहे. आपल्या भावी पिढयांना या चित्रपटांतून आत्मविश्वास व प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘शिवराज अष्टका’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शिवराज अष्टका’ तील चित्रपटही आपल्या भावी पिढयांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *