प्रबोधनाचा वारसा सांगणारा काव्यसंग्रह : टेंभा
बाबासाहेबांनी शोषित, वंचित आणि उपेक्षित बहुजन समाजाला नवी दिशा, अधिकार आणि स्वाभिमान दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण ठेवताना, प्रत्येक संवेदनशील कवीला आपल्या शब्दांतून त्यांचे ऋण मान्य करण्याची प्रेरणा मिळते. कवितेतून तो कधी बाबासाहेबांच्या विचारांचे जयगान गातो, कधी त्यांच्या संघर्षांची जाणीव करून देतो, तर कधी त्यांच्या कार्यामुळे स्वतःला मिळालेल्या माणुसकीच्या अस्तित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.अशा काव्यांतून एक प्रकारे समाजातील परिवर्तनाचे साक्षीदार असलेले भाव उमटतात. बाबासाहेबांनी दिलेल्या स्वातंत्र्याची, शिक्षणाची, न्यायाची आणि समानतेची जाणीव कवितेच्या ओळींमधून प्रकट होते. त्यामुळे कवीच्या कृतज्ञ पोटी उमटलेले शब्द, हे केवळ स्मरण नसून भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. बाबासाहेबांबद्दल कवीची कृतज्ञता म्हणजे त्याच्या कवितेतून उमटलेले प्रेम, आदर, प्रेरणा आणि जागरूकतेचे जिवंत चित्र होय.
असेच एक काव्य पुष्प म्हणजे कवी अनिल जाधव यांचे ‘टेंभा’ होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञा सूर्य आहेत. सूर्य हा निरंतर प्रकाश देत असतो. ही भावना मनी ठेवून कवी आपल्या काव्यातून व्यक्त होताना काव्यसंग्रहाचे नाव टेंभा ठेवतो. टेंभा म्हणजे काळोख्या रात्री काठीच्या टोकाला चिंध्या बांधून रॉकेल टाकून निर्माण केलेला प्रकाश. हा प्रकाश त्या जाणाऱ्या वाटसरुंची वाट उजळीत असतो. इथे एक सुंदर रूपक कवीने वापरले आहे.
कविता ही ज्ञान, सत्य आणि विवेकाचा आवाज असते. जेव्हा कवी प्रबोधनाच्या वारशाचा उल्लेख करतो तेव्हा तो समाजाला दिलेला प्रकाश दाखवतो. बाबासाहेब, जोतीराव फुले, शाहू महाराज, संत परंपरा यांनी दिलेल्या शिक्षण, समता, मानवता या मूल्यांचा ठेवा कवितेतून जाणवतो. हा वारसा म्हणजे अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानावर प्रकाश टाकणारी ज्योत. कवितेतून कवी हा वारसा पुढच्या पिढीकडे नेण्याचा प्रयत्न करतो.
प्रबोधनाच्या वारशाला नेहमीच आव्हान असते. भेसळ म्हणजे खरी समता, खरी मानवता झाकून टाकणारी खोटी रूढी, परंपरा, अहंकार, स्वार्थ. कवी जेव्हा यावर लिहितो तेव्हा, तो समाजाला जागृत करतो. लोकांच्या मनातील कपट, पाखंड, भेदभाव हे उघडे पाडतो.
मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील सत्य उघड करण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची, दुर्बलांचा आवाज पोहोचवण्याची ताकद त्याच्यात आहे. पण त्याच वेळी कवीला दिसते की, आज मीडिया अनेकदा पक्षपाती होतो, TRP आणि नफ्याच्या मागे लागतो, खोट्या बातम्या किंवा सनसनाटी मुद्दे पुढे आणतो. समाजाचे प्रश्न, शोषितांचा आवाज, शेतकरी-श्रमिकांच्या समस्या बाजूला पडतात. हे कवी मीडिया या कवितेतून मांडतो.
कवीने विदेश भ्रमण केलेले आहे. सौदी अरब, दुबई व सलतनत ऑफ ओमान या तिन्ही देशात दहा वर्षे वास्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्या कवितेत भारतातील आणि विदेशातील परिस्थितीचे अनुभवांचे तुलनात्मक वर्णनही येते.
या काव्यसंग्रहात टेंभा या कवितेपासून सण या कवितेपर्यंत विविध विषयांवरील एकूण 68 कविता आलेल्या आहेत.
त्यामध्ये बुद्धांपासून सर्व राष्ट्रपुरुष, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई यांच्यावरही कविता आहेत. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग काव्यरूपात आलेले आहेत. त्यामध्ये सोनबा येलवे ही आहे. त्याचबरोबर मनुस्मृती,तिचे परिणाम सांगणारी कविता बोलकी आहे. समाजातील शोकांतिकां आपल्या काव्यातून मार्मिकपणे कवीने मानली आहे . खैरलांजी सारख्या सामाजिक प्रश्नावरही कवी अगदी पोटतिडीकीने बोलतो.
त्याचबरोबर विचित्र भारत या आपल्या काव्यातून देशातील विषमतेवर नेमकेपणाने बोटही ठेवतो.
संघर्षातून पुढे येत, कवीने आपले जीवन यशस्वी केले आहे.हा एक नव पिढीसाठी आदर्श ठरू शकतो. या काव्यसंग्रहाला प्राध्यापक संध्याताई वैद्य यांची प्रस्तावना लाभली आहे. तर राजेंद्र सोनवणे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आहे.
साईराज पब्लिकेशन पुणे पुस्तक प्रकाशित केले असून, शीर्षकाला अनुसरून चित्रकार सुहास जगताप यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. वाचक नक्की या काव्यसंग्रहाचे स्वागत करतील.
पुस्तकाचे नाव : टेंभा
कवी : अनिल जाधव
9970312109
प्रकाशक : साईराज पब्लिकेशन पुणे
मूल्य… 120 /–
पुस्तक परिचय
किशोर कासारे
मंडणगड (दाभट)