EntertainmentMarathi

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

’अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘मंबाजी’च्या भूमिकेत दिसणार

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहेत. या यादीत आता अभिनेते अजय पूरकर यांचा समावेश झाला आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात ‘मंबाजी’ या नकारात्मक रूपात आपल्याला ते दिसणार आहेत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

संत तुकोबांचे वाढते प्रस्थ पाहून ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखत होते त्यात मंबाजी हे आघाडीवर होते. काही ना काहीतरी कुरापत काढायची आणि संत तुकोबांना छळायचे हे त्यांचे नित्याचेच काम होते. ‘मंबाजी’ यांचा नीचपणा एवढा होता की तुकोबांना गुरुस्थानी मानणाऱ्या बहिणाबाई यांनी त्याचे वर्णन *विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगी* असे केलेले आहे.

‘मंबाजी’ या आपल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर सांगतात, ‘याआधीच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या. आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटातून मी केला आहे. ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे. कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्त्वाची वाटते. कलाकार म्हणून माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्त्वाचं आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली.

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *