‘ह्युमन कोकेन’ – वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारक अनुभव
भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या जगात घेऊन जाणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर जोग पुन्हा एकदा एका प्रभावी आणि आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा आणि ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप म्हणून ओळख मिळवल्यानंतर, तसेच ‘व्हिक्टोरिया – एक रहस्य’च्या यशानंतर, पुष्कर आता पूर्णपणे वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर आधारित सिनेमात झळकणार आहे.
या चित्रपटाबद्दल पुष्कर म्हणतो, ” ‘ह्युमन कोकेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक चित्रपट आहे. या पात्रात शिरण्यासाठी मी मानसिक आणि शारीरिक तयारीसोबत बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष समजून घेणं अजिबात सोपं नव्हतं.”
चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची तगडी स्टारकास्ट असून चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय लुक प्राप्त झाला आहे. सरीम मोमिन लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, आणि टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गूजबंप्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली आहे. ची तेंग जू आणि हरीत देसाई ‘ह्युमन कोकेन’ चे निर्माते असून छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, संगीत क्षितिज तारे, तर नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी आणि खालिद शेख यांनी केले आहे.
युनायटेड किंगडममध्ये चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर आपल्याला सामोरे येण्यास भीती वाटणाऱ्या वास्तवाचं निःसंकोच प्रतिबिंब आहे. ‘ह्युमन कोकेन’ येत्या नवीन वर्षात म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
By Sunder M
