वासनेनं पेटलं, जातीनं विझवलं’ म्हणत ‘राजा राजा’ गाण्यातून अमृता धोंगडेचा जबरदस्त लूक
“प्रेमाची सुरुवात जात पाहून होत नाही, पण प्रेम निभावण्याची वेळ आली की जात वेगळी आहे म्हणून समोरून त्या प्रेमाचा शेवट केला जातो”, या संवादाने ‘राजा राजा’ या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता आयुष संजीव अभिनीत ‘राजा राजा’ या गाण्याचा लक्षवेधी टीझर समोर आला आहे. अर्थात टिझरने संपूर्ण गाण्याची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. इतकंच नाहीतर या गाण्याच्या संगीताने ही साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. संगीतकार हितेश मोडक यांचे संगीत असलेलं हे गाणं तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
राजा राजा गाण्याचा टिझर पाहून दिग्दर्शकाचं तोंडभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अर्थात हे गाणं पाहून त्याच्या चित्रीकरणाच्या पद्धतीची तारीफ केली जात आहे. अमृता धोंगडेचा अभिनय असलेल्या ‘राजा राजा’ गाण्यात परफेक्ट कॉम्बो पाहायला मिळत आहे. अमृताच्या या लूकवर नजरा खिळल्या आहेत. अगदी गावरान लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सतत पाऊस, व्हॅनिटी नाही अशा अनेक समस्या समोर असताना अमृताने २०० डान्स कृसह हे गाणं शूट केलं. गाण्याच्या शुटवेळी अमृताची तब्येतही ठीक नव्हती, मात्र तिने हे कुठेही जाणवू दिलं नाही. कारण अभिनयाप्रती असलेलं तिचं प्रेम. आणि अर्थात गाण्याच्या टीझरमध्ये तिच्या मेहनतीचं फळ दिसत आहे

गाण्याच्या टिझरवरुन या गाण्याच्या कथेत दोन प्रेमींमध्ये जातीमुळे आलेला दुरावा पाहायला मिळत आहे. अर्थात हा दुरावा संगीतकार हितेश मोडक यांनी त्यांच्या संगीताने अगदी उठावदार केला आहे. दिग्दर्शक सचिन कांबळेने हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. ‘जीव रंगला’, ‘लल्लाटी भंडार’ यांसारखी आयकॉनिक गाणी लिहिणारे गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर गायक रामानंद उगले, सौरभ साळुंखे, श्वेता दांडेकर यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं गायलं आहे. तर हे सुंदर गाणं अगदी अचूक लोकेशनसहीत सुनीत गुरवने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
‘हितेश मोडक ओरिजिनल्स’च हे पहिलंच गाणं असून टिझर पाहूनच गाण्याची उत्सुकता वाढली आहे. आजवर हितेश मोडक यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. इतकंच नाहीतर दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी पेलवली आहे. तर मनसे पक्षाच्या गाण्यालाही हितेश मोडकने संगीत दिलं आहे.
गाण्याबाबत बोलताना संगीतकार हितेश मोडक म्हणाले की, “युट्युबसाठी काहीच limitations नाही आहेत म्हणून मी या प्लॅटफॉर्ममार्फत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ‘हितेश मोडक ओरिजिनल्स’ मार्फत केला. आपल्या दिग्गजानी संगीतात जे कार्य केलं आहे त्याला व्हिडीओचे स्वरूप देण्याचा माझा प्रयत्न आहे. अगदी सिनेमासारखं गाण्याचं शूट हवं आहे त्यामुळे त्याचा विचारही तितकाच मोठा पाहिजे. जातीवरुन समाजात बरेचदा चर्चा होते त्यामुळे या मुद्द्याने मला उत्स्फूर्त केलं आणि मी ‘राजा राजा’ हे गाणं बनवलं. हे ब्रेकअप सॉंग आहे. भावना दुखावल्यानंतर एक मुलगी काय करु शकते, ते या गाण्यातील डान्समधून मांडलं आहे. अमृताने हे गाणं खूप अडथळ्यांचा सामना करत पार केलं आहे”.
By Sunder M
