EntertainmentMarathi

गोंधळ’ची ऐतिहासिक जागतिक झेप! सात भाषेत १०० टक्के व्हिज्युअल डब करणारा जगातील पहिला चित्रपट

तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून पोहोचणार जगभरात

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठत संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटाने आता जागतिक झेप घेतली आहे. ‘गोंधळ’ तब्बल ७ भाषांमध्ये डब झाला असून, व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा प्रकारे सादर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे.

या चित्रपटाने सुरुवातीपासूनच आपल्या वेगळ्या आशयामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, संस्कृतीशी जोडलेली कथा आणि भावनांचा प्रवाह यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहात नाही, तर तो एक वेगळाच अनुभव देतो. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘गोंधळ’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि दमदार कथानकासाठी या चित्रपटाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. तसेच भारताकडून निवड होणाऱ्या ॲास्करच्या अधिकृत प्रवेशासाठीच्या स्पर्धेमध्ये ‘गोंधळ’ आपला सहभाग नोंदवणार आहे.

आता या यशस्वी प्रवासाला नवे पंख मिळाले असून, ‘गोंधळ’ जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. व्हिएफएक्स आणि एआयच्या माध्यमातून आवाजासह पात्रांच्या ओठांच्या हालचालीही त्या-त्या भाषेनुसार सुसंगत केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या भाषेत अधिक नैसर्गिक आणि जवळचा वाटेल. यापूर्वी फक्त मुख्य कलाकारांसाठी व्हिज्युअल डबचा वापर करण्यात आला होता. परंतु ‘गोंधळ’साठी शंभर टक्के व्हिज्युअल डबचा वापर करण्यात आला आहे. तसेच या व्हिएफएक्सच्या सगळ्या प्रक्रियेसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.

ही गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे मराठी स्पेशल स्क्रीनिंग मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर आणि बंगळुरू येथील सुचित्र फिल्म सोसायटी येथे पार पडले आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

याबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ” ‘गोंधळ’ चित्रपट हा आपल्या मातीचा, संस्कृतीचा आणि भावनांचा एक प्रामाणिक प्रवास आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमधून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा आणि ‘गोंधळ’च्या कथानकातील थरार जगभरातील प्रेक्षकांना अनुभवता यावा, तसेच ही लोकसंस्कृती जतन व्हावी, या उद्देशानेच आम्ही हा चित्रपट विविध भाषांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचेल आणि आपल्या गोष्टींची ताकद अधिक ठळकपणे समोर येईल, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. तसेच व्हिज्युअल डब या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या भाषेत नैसर्गिक वाटेल आणि त्याच भावनेने ते जोडले जातील.”

‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी या चित्रपटाला दमदार अभिनयाची ताकद दिली आहे. पॅन इंडिया पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या या चित्रपटाला दिग्गज संगीतकार इलैयाराजा आणि अजय गोगावले यांच्या संगीताने खास उंची प्राप्त झाली आहे.

दरम्यान, ‘गोंधळ’चे सर्व भाषेतील डायलॉग प्रोमो एप्रिल महिन्याच्या शेवटी युट्यूबवर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *