EntertainmentMarathi

बहुचर्चित चित्रपट ‘खालिद के शिवाजी’आता ओटीटीवर

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

पी.पी.सिनेप्रोडक्शन प्रस्तुत ‘खालिद के शिवाजी’ या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रभावी भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत सहजतेने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे. अमेरिकेतील अग्रगण्य मानसिक आरोग्य सेवा संस्था Omni Health Care Services चे अध्यक्ष असलेले मायकल थेवर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दिग्दर्शक राज प्रितम मोरे म्हणाले, ‘खालिद के शिवाजी’ हा माझा पहिला मराठी चित्रपट असून, या चित्रपटासाठी मी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आज हा चित्रपट Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर जगभर प्रदर्शित होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारे निर्माते मायकल थेवर आणि संपूर्ण टीमचे मी ऋणी आहे. अकोल्यातील नागरिकांनी चित्रीकरणादरम्यान दिलेले प्रेम आणि सहकार्यही माझ्यासाठी कायम स्मरणात राहील. “ही एका निरागस मुलाची खालिदची कथा आहे. समाजव्यवस्थेतील दोषपूर्ण रचनेचा तो नकळत बळी ठरतो. या व्यवस्थेतून स्वतःला मुक्त करण्याचा तो प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या समोर जात, धर्म, लिंग, पंथ, वंश आणि अशा अनेक सामाजिक भेदभावांचे कटू वास्तव उलगडत जाते.एका लहान मुलाच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समाजात आजही खोलवर रुजलेल्या अन्यायकारक आणि विषारी व्यवस्थेचे शुद्धीकरण व्हावे, समानता, मानवता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या कथेचा प्रामाणिक उद्देश असल्याचे दिग्दर्शक राज प्रितम मोरे सांगतात.

‘आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. खालिदच्या निरागस नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा अर्थ उलगडत जातो’. धर्म, जात आणि सामाजिक भेदांपलीकडे जाऊन माणुसकीच सर्वश्रेष्ठ आहे, हा संदेश हा चित्रपट देतो. हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकाने घ्यावा’, असे निर्माते मायकल थेवर यांनी सांगितले.

चित्रपटात खालिद नावाच्या एका निरागस मुस्लिम मुलाची कथा उलगडते. शाळेत त्याला ‘अफजलखान’ म्हणून चिडवलं जात असल्यामुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
समाजात वाढत चाललेल्या धार्मिक आणि सामाजिक दुराव्याच्या पार्श्वभूमीवर एक मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली. याच आशयामुळे या चित्रपटाची प्रतिष्ठित Marché du Film या विभागात, कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये निवड झाली होती, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली. तसेच इफ्फी (IFFI) इंडियन पॅनोरामा, गोवा २०२५ आणि अजिंठा–वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Ajanta-Ellora International Film Festival) अंतर्गत India Focus Special Screening साठी चित्रपटाची निवड झाली होती.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा अनुभवायला मिळतो. स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. विदर्भातील अनेक नवोदित कलाकारांना जागतिक प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे.

चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी ज्यांची राहून गेली, तसेच पुन्हा एकदा या विचारप्रवर्तक कलाकृतीचा अनुभव घ्यायचा असेल, अशा सर्व प्रेक्षकांसाठी आता ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘खालिद के शिवाजी’ आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असून, संपूर्ण कुटुंबासोबत या आशयघन, संवेदनशील आणि प्रेरणादायी चित्रपटाचा नक्की आस्वाद घ्या.

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *