EntertainmentMarathi

पंडित अजित कडकडे यांच्या भावस्पर्शी आवाजातील ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ गीत सप्तसूर म्युझिकवर प्रदर्शीत 

दत्तभक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा दिव्य अनुभव जागवणारे “‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा'” हे भक्तिगीत नुकतेच ‘सप्तसूर म्युझिक’ यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. “कृतार्थ झाला जन्म पाहुनी सगुण रूप साकार, दत्त दत्त स्मरता तरला ब्रम्हांडाचा भार” या ओळींमधून दत्तगुरूंच्या कृपेचा आणि त्यांच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाचा भावपूर्ण आविष्कार या गीतातून अनुभवायला मिळतो. तब्बल 12 वर्षांनी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचे नवीन गाणे अल्बम सॉंगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सप्तसूर म्युझिकने या गाण्याची निर्मिती केली असून
साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष हे या गाण्याचे निर्माते आहेत. गीतकार साई दळवी यांनी शब्दरचना केली असून संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. संगीत संयोजन निषाद गोलांबरे यांनी केले आहे. तबल्यावर शुभम सुतार, पखवाजावर तेजस मोरे यांनी साथ दिली असून मयुरेश, गीता गोलांबरे आणि बीना राजाध्यक्ष यांच्या कोरसने गीताला अधिक भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे.

दत्तगुरू हे श्रद्धा, संयम, ज्ञान आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होऊन मनाला शांतता आणि आत्मिक समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हीच भक्तिभावाची अनुभूती ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गीतातून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.

ज्येष्ठ आणि ख्यातनाम गायक पंडित अजित कडकडे यांच्या भारदस्त, भावस्पर्शी आणि भक्तिरसपूर्ण आवाजाने हे गीत अधिकच प्रभावी बनले आहे. त्यांच्या गायकीतील भक्तिभाव प्रत्येक श्रोत्याच्या मनाला स्पर्श करतो आणि दत्तभक्तीची अनुभूती अधिक गहिरी करतो.
नेहमीच श्रोत्यांच्या आवडीनिवडी ओळखून दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण गीते सादर करणारे सप्तसूर म्युझिक भक्तिगीते, भावगीते, मराठी गीते आणि विविध संगीतप्रकारांमधून सातत्याने रसिकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक निर्मितीत गुणवत्ता, आशय आणि संगीताची समृद्धता जपत श्रोत्यांसाठी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न सप्तसूर म्युझिककडून केला जात असल्याचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी सांगितले.

दत्तभक्तांसह संगीतप्रेमींसाठीही ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे गीत एक आध्यात्मिक आणि संगीतमय पर्वणी ठरणार आहे.

YouTube player

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *