‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’चा ट्रेलर प्रदर्शित…
‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेतीच्या गंभीर समस्येवर आणि तिच्या समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रभावी भूमिका असलेला हा चित्रपट दडलेले सत्य उलगडत लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या संकटाची जाणीव करून देतो. दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण असा हा ट्रेलर सत्य, न्याय आणि जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवतो.

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरबद्दल बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ चित्रपट नाही, तर समाजाने करायलाच हवा असा एक महत्त्वाचा संवाद आहे. प्रत्येक घरावर शांतपणे परिणाम करणाऱ्या एका गंभीर विषयावर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. ट्रेलर हा सत्य, धैर्य आणि जिद्दीच्या प्रवासाची एक झलक आहे. प्रेक्षकांनी या विषयावर विचार करावा, प्रश्न विचारावेत आणि वास्तव समजून घ्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
चित्रपटाविषयी बोलताना काजल अग्रवाल म्हणाल्या, “‘द इंडिया स्टोरी’चा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण अनुभव ठरला. माझी व्यक्तिरेखा सर्व अडचणींना सामोरी जात सत्यासाठी उभी राहते आणि हाच या चित्रपटाचा सर्वात मोठा आत्मा आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल आणि त्यांना हा प्रभावी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण करेल, अशी मला आशा आहे.”
आपला उत्साह व्यक्त करत श्रेयस तळपदे म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर या चित्रपटाचा भावनिक गाभा प्रभावीपणे मांडतो. एका सामान्य माणसाने आशा आणि जिद्दीच्या बळावर एका असामान्य आव्हानाविरुद्ध दिलेल्या लढ्याची ही कथा आहे. या चित्रपटातील भावना आणि संदेश प्रत्येक प्रेक्षकाला नक्कीच आपलासा वाटेल. २४ जुलै रोजी चित्रपटगृहात हा अनुभव सर्वांनी घ्यावा, यासाठी मी उत्सुक आहे.”
या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनीता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तांत्रिक टीममध्ये छायांकन – निशांत भागवत, संगीत – मंगेश धाकडे, संकलन – आशीष म्हात्रे, गीतकार – शकील आझमी आणि ध्वनी संयोजन – अनमोल भावे यांचा समावेश आहे.
By Sunder
