EntertainmentMarathi

स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आणि या पोस्टरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात १९४२ साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी डी लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलुमी,सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली. प्रतिसरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

पोस्टर मध्येच हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार झालेला योद्धा आणि ब्रिटिश सैनिक यांच्यातील संघर्षाची झलक पाहायला मिळतेय. पार्श्वभूमीला दिसणारी आग, धूर आणि युद्धजन्य वातावरण चित्रपटाच्या कथानकातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित करत आहे. चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरने एक वेगळाच ऐतिहासिक आणि लढाऊ अंदाज येत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर’ तर्फे ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अनसुरकर यांनी पेलली आहे. कर्तव्य मोकल यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे तर संदीप वाटवे, सुमेध मराठे, परमहंस पाठक यांचे छायाचित्रण आहे. सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्व संगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांनी आपल्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत

चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, “ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटातून केला आहे. गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन या धुरा सांभाळताना बरंच दडपण होतं. कारण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून दाखवायचा होता. पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते सहज शक्य झालं. क्रांतीच्या इतिहासाला सिनेमॅटिक रूप देत हा चित्रपट बनवला आणि त्याचं पहिलं पोस्टर समोर आलंय. चित्रपटातील टिझर, ट्रेलरवरून आणखी गुपित उलगडतील आणि उत्सुकता नक्कीच वाढेल”. महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची आणि क्रांतीकारकांच्या शौर्याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *