GENERALMarathi

शिक्षण महर्षी श्री स. तु.कदम यांच्या विचारांचा समृद्ध राजकीय व शैक्षणिक वारसा म्हणजे – शिक्षणविज्ञ श्री वागेश कदम  

शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचे माध्यम नसून, व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि समाजाला दिशा देण्याची प्रक्रिया आहे, या विचाराला आपल्या कार्यातून मूर्त रूप देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वागेश सदानंद कदम.

सात दशकांचा जीवनप्रवास पूर्ण करताना श्री.वागेश कदम यांनी शिक्षणक्षेत्राकडे कदापि व्यवसाय म्हणून न पाहता, एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिलेआहे . विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या संस्कारक्षम, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्तिमत्त्वनिर्मितीला त्यांनी महत्त्व दिले.

शिक्षणशास्त्रातील बदलत्या प्रवाहांचा अभ्यास, विद्यार्थ्यांच्या गरजांची जाण, शिक्षकांची भूमिका, शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि समाजाच्या बदलत्या अपेक्षा यांचा समतोल विचार करणारे ‘शिक्षणविज्ञ’ म्हणून त्यांची ओळख अधोरेखित होते. पारंपरिक शिक्षणपद्धतीसोबतच आधुनिक विचार, प्रयोगशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समन्वय साधत जीवन विकास शिक्षण संस्थेचे , कोषाध्यक्ष  कार्याध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष म्हणून गेली पाच दशके अभ्यासपूर्ण कामकाज करताना संस्थेच्या पालघर,शिगांव व दांडी येथील अनुदानित माध्यमिक विद्यालय व अनुदानित आश्रम शाळांचा अधिक विस्तार करत पालघर येथे श्री स.तु. कदम प्राथमिक विद्यालय, श्री स.तु. कदम आर्ट्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज तसेच श्री स. तु. कदम इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई )  दांडी येथे अणु विकास इंग्लिश मीडियम स्कूल तसेच शिगांव आश्रम शाळा येथे आर्ट्स व सायन्स निवासी ज्युनिअर कॉलेज सुरू करून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत मैलाचा दगड रोवला आहे .त्यांच हे  शैक्षणिक योगदान उल्लेखनीय आहे.एक आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून विद्यार्थ्यांशी पालकांशी व आपल्या शिक्षकांशी  जिव्हाळ्याचे नाते निर्माण करताना, एक मार्गदर्शक म्हणून आपल्या सहकाऱ्यांना दिशा देताना आणि शिक्षणक्षेत्रातील विविध उपक्रमांना पाठबळ देताना त्यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र छाप निर्माण केली. त्यांच्या विचारांत शिस्त, संस्कार, ज्ञान, सामाजिक जाणीव, परिवर्तनशीलता आणी आपले वडील शिक्षण महर्षी श्री स. तु.कदम यांच्या विचारांचा समृद्ध राजकीय व शैक्षणिक वारसा  यांचा सुंदर मिलाफ हे त्यांच राजकारणात नसताना सुद्धा पालघर जिल्ह्यातील राजकीय वजन व सामाजिक प्रभावातून दिसून येते .

श्री.वागेश कदम यांचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविण्याच्या ध्यासाचा प्रवास आहे. त्यांचे आपल्या आस्थापनातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांशी असलेले कौटुंबिक व वडीलकीचे नाते यातून संस्थाचालक व शिक्षकांमध्ये एक आगळीवेगळी वीण निर्माण झाली आहे.  त्यांच्या अनुभवातून अनेक पिढ्यांना मार्गदर्शन मिळाले.त्यांनी पालघर येथील “एक मराठा लाख मराठा ” चळवळीतील  ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व करत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना एकत्र आणून पालघर येथे सिंदूरत्न मित्र मंडळाची स्थापना करून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत.

वयाची सत्तरी गाठताना त्यांच्या अनुभवाची शिदोरी अधिक समृद्ध झाली आहे. पालघर जिल्हा संस्थाचालक संघाच्या पुढील वाटचालीतही त्यांचे नेतृत्व ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन पालघर जिल्ह्याच्या शिक्षणक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरावे, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

सात दशकांचा अनुभव, ज्ञानाची अखंड साधना आणि समाजघडणीची तळमळ—हीच श्री वागेश कदम साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख!

श्री.वागेश कदम साहेब यांना ७०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! व उत्तम आरोग्यासाठी मंगल कामना!

 

गणेश प्रधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *