EntertainmentMarathi

गोरक्षणाच्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा ‘धाराऊ’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित; सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा!

गोमातेप्रती असलेली श्रद्धा, गोरक्षणाचा विषय आणि एका लहानग्याचं आपल्या आईशी असलेलं भावनिक नातं यांची गुंफण असलेला ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आज, २३ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू असून, आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर ही भावस्पर्शी कथा अनुभवता येणार आहे.

आई आणि लेकराचं नातं हे जगातील सर्वात निःस्वार्थ नात्यांपैकी एक मानलं जातं. मात्र, आईच्या मायेचा अनुभव एका लहानग्याला गोमातेमध्ये मिळाला, तर? हाच भावनिक धागा पकडत ‘धाराऊ’ चित्रपटातून एका निरागस बालमनाची आणि गोमातेची हृदयस्पर्शी कहाणी उलगडते. गोमातेप्रती असलेली श्रद्धा, भारतीय संस्कृतीतील तिचं स्थान आणि माणूस व प्राणी यांच्यात निर्माण होणारं नातं या विषयांना चित्रपटातून स्पर्श करण्यात आला आहे.

‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ ही चित्रपटाची टॅगलाइनच या कथेमागील भावविश्व अधोरेखित करते. गोमाता ही केवळ एक गाय नसून, तिच्यामध्ये आईचं रूप पाहणाऱ्या एका लहानग्याच्या भावविश्वातून चित्रपट प्रेक्षकांशी संवाद साधतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ गोरक्षणाच्या विषयापुरता मर्यादित न राहता, माया, प्रेम, श्रद्धा आणि भावनिक नात्यांचा अनुभव देणारा ठरतो.

या चित्रपटाचं लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे यांनी केलं आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे.

गोरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाला भावनिक कथेची जोड देणारा ‘धाराऊ’ प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि नात्यांमधील मायेची जाणीव करून देणारा चित्रपट आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनंतर आता चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या ‘धाराऊ’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *