EntertainmentMarathi

शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.

वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *