EntertainmentMarathi

अंगावर काटा आणणारा “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

अंगावर काटा आणणारा “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.

साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी “धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती.

२०२२ ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला. दिघे साहेबांचे कार्य खुप मोठे आहे जे केवळ एका भागत दाखवणे शक्य नाही.
दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे “कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” कारण नेत्याने लोकांच्या सुख- दुःखात, अडी-अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे. प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही. मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांचे काम छान झाले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा. चित्रपट डबल हीट होईल अशा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो असे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित “धर्मवीर – २” या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदेसाहेब असो किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणेच शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशिर्वाद देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. मलाही सिनेमा काढायचा आहे पण अजुन थोडा वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा करेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल. चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

‘आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग ‘ या वाक्यापासून सुरू होणारा “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला गुंतवून ठेवतो. सर्वसामान्यांमध्ये राहणारे, सर्वसामान्यांसाठी झटणारे, भगव्यासाठी आणि हिंदुत्त्वासाठी लढणारे दिघेसाहेब पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये दिसतात. ‘तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार’ या दिघे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉग ने तर अंगावर काटा उभा राहतो. ट्रेलरमध्ये एकनाथ शिंदे साहेबही दिसतात. “धर्मवीर – २” चित्रपटाची टॅगलाइन ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असल्यानं आता या चित्रपटातून काय दाखवलं जाणार याची उत्कंठा आता अधिकच वाढली गेली आहे.

“धर्मवीर – २” चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या चित्रपटातील “चला करू तयारी…” ह्या गीताने अल्पावधीतच रसिक श्रोत्यांची मने जिंकली असून लवकरच अन्य गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

“धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

YouTube player

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *