EntertainmentMarathi

चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची घोषणा! दिनांक २८ – २९ सप्टेंबरला मुंबईत भव्योदात्त सोहळा!!

चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां’ची घोषणा!
दिनांक २८ – २९ सप्टेंबरला मुंबईत भव्योदात्त सोहळा!!

*मुंबई( सांस्कृतिक प्रतिनिधी)* : कोकण खेड्यातल्या आपल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४ च्या अक्षय्य तृतीयेला सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेने विविधांगी असे ६१ उपक्रम अंगीकारत, हाताळत कालच्या अक्षय्य तृतीयेला आपल्या वाटचालीची पन्नास वर्षे पूर्ण केली. मुंबई पाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा…. असा सहा केंद्रांवर आपला पसारा वाढवीत, महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४० हून अधिक स्थळ – ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षात १८०० हून अधिक कार्यक्रमांचा(इव्हेंट चा) टप्पा पार केला आहे. अर्थातच यासाठी त्यांना भरभरून सहकार्य पाठबळ पाठिंबा मिळाला तो सर्व क्षेत्रांतील असंख्य अगणित लोकप्रिय कलावंतांचा! नामवंत, गुणवंत अशा अनेक मान्यवरांचा!! चतुरंग उभी राहायला, प्रस्थापित करायला ज्या ज्या सज्जन दिग्गजांनी, त्या त्या काळात चतुरंगला आधार दिला त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे प्रतिष्ठानने मुंबई खेरीज आपल्या रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर मोठ्या झोकदारपणे आणि दिमाखात साजरे केले आणि आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये भव्य प्रमाणावर करण्याचे योजिले आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे चतुरंग सुवर्णरत्न सन्मान योजना.

चतुरंगच्या हातून पार पडलेले सुमारे १८०० हून अधिक कार्यक्रम हे ज्यांच्या कलावंतपणातून, प्रेरणेने, प्रोत्साहनाने चतुरंगला साकार करता आले अशा १४ विद्या ६४ कलांपैकी किमान ११ क्षेत्रांतील नामवंत – गुणवंतांचा भाव्योत्कट असा जाहीर सन्मान आपल्या हातून घडावा. त्या किमान ११ जणांच्या उत्तुंग, लक्षवेधी, दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल आपल्या हातून त्यांचे जाहीर वंदन – पूजन घडावे या सदिच्छातून सुवर्णरत्न सन्मानाची संकल्पना पुढे आली असून, या सन्मानासाठी पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन) बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे ( राष्ट्रीय सुरक्षा) अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व नामवंत मान्यवरांनी सन्मान स्वीकृतीसाठी संमती दर्शविलेली असून हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत निवड करण्यासाठी ११ क्षेत्रातील प्रत्येकी ३-३ मातब्बर – अनुभवी अभ्यासक अशा एकूण ३३ मान्यवर निवड समिती सदस्यांनी काम पाहिलेले असून, त्या सर्वांच्या साक्षीने, त्यांच्याच उपस्थित हा ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मान सोहळा’ शनिवार – रविवार दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादर मध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग प्रतिष्ठानकडून घोषित करण्यात आले आहे. त्याप्रसंगी होणाऱ्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, संवाद, गायन, वादन….अशा विविध स्वरूपातील कार्यक्रमांचे तपशील लवकरच घोषित केले जातील असे प्रतिष्ठानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *