EntertainmentMarathi

सॅनहोजे – कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा! २५ -२७ -२८ जुलैला होणार चित्रपट महोत्सव!

सॅनहोजे – कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा!
२५ -२७ -२८ जुलैला होणार चित्रपट महोत्सव!
अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीउभारण्याचे स्वप्न!

‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली होती. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दर वर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. गेल्यावर्षी प्रथम म्हणजे २०२४ च्या २७ आणि २८ जुलै रोजी हा सोहळा कॅलिफोर्नियामध्ये अमेरिका, कॅनडा मध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत पहिला भव्यदिव्य महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी २५, २६ आणि २७ जुलै २०२५ ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅन होजे येथे संपन्न होणार असल्याची घोषणा नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत केली.

उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी, भारतीयांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याची धडपड अभिजित घोलप ‘नाफा’च्या माध्यमातून करीत आहेत. दर महिन्याला १ मराठी चित्रपट ‘उत्तर अमेरिका – कॅनडा’मध्ये २०२४ पासून प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिकेत आणि कॅनडामध्ये नाफाद्वारे रितसर चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी तिथे प्रदर्शित झाले असून अमेरिकेत या सर्व चित्रपटांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत.

अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अभिजित घोलप नाफाची कार्यप्रणाली विकसित करीत असून तेथील अनेक तरुण कलावंत, प्रेक्षक जोडले जात असल्याचे घोलप सांगतात. ते म्हणाले. “‘देऊळ’ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. माझ्या या विचाराशी सहमत असलेले ५००हून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. वर्षाअखेरीस दोन लघुपटाची निर्मिती करण्याचं ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कार्यविस्तार होत आहे., विविध क्षेत्रात आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांना मनोरंजनक्षेत्रात आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. गेल्यावर्षीच नाफाने या दिशेने पहिले पाऊल टाकले असून,अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटसृष्टी उभारणीचं स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञाच्या साथीने लवकरच ते पूर्णत्वास जाईल.”

‘नाफा २०२४’ महोत्सवामध्ये जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुबोध भावे, दिग्दर्शक जब्बार पटेल, उमेश कुलकर्णी, डॉ. सलील कुलकर्णी, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मेधा मांजरेकर इत्यादींची उपस्थिती लाभली होती.

यावर्षी NAFA फिल्म फेस्टिव्हल २५, २६, २७ जुलै २०२५ रोजी, कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. नाफा महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *