EntertainmentMarathi

बिन लग्नाची गोष्ट’ च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकदा एकत्र!

गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. त्याची चर्चा अजून थांबलेली नाही, तोच आता सोशल मीडियावर या चित्रपटाचं दुसरं पोस्टर झळकलं आहे. या मोशन पोस्टरनेही प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण केले आहेत. आता दुसऱ्या पोस्टरमध्ये निवेदिता सराफ आणि गिरीश ओक या लोकप्रिय कलाकारांची जोडी दिसत आहे आणि तीही एका गंमतीशीर पद्धतीने !

मोशन पोस्टरमध्ये सोफ्यावर बसलेल्या निवेदिता सराफ यांच्या डोक्यावर मुंडावळ्या आहेत, परंतु चेहऱ्यावर नवरीसारखी लाजरीबुजरी नाही तर मिश्किल शांतता आहे. त्यांच्यामागे गिरीश ओक अत्यंत खुश चेहऱ्याने हात दाखवून काहीतरी सांगू पाहात आहेत. हे दृश्य पाहून एक कळतेय की, हे पारंपरिक जोडपं नाही परंतु, त्यांचं नातं मात्र पक्कं आहे!

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”आजच्या पिढीला नात्यांबाबत स्पष्टता आहे, पण लग्नाविषयी गोंधळही आहे. काही वेळा प्रेम, मैत्री आणि जबाबदारी ही लग्नाच्या साच्यात न बसताही खूप सुंदर नातं उभारते, ‘बिन लग्नाची गोष्ट’ त्याचं एक हलकंफुलकं, तरीही अर्थपूर्ण प्रतिबिंब आहे. निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट, उमेश कामत हे चौघेही जबरदस्त कलाकार आहेत. त्यांच्या अप्रतिम अभिनयाने ही गोष्ट अधिकच जिवंत झाली आहे.”

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ” आजची तरुण पिढी नात्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघते. हे चित्रपटातून दाखवताना आम्ही गंमतीची किनार कायम ठेवली आहे. प्रत्येक वयोगटाला ही गोष्ट रिलेट होईल. हलक्याफुलक्या मांडणीतून ही कथा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजेल, याची आम्हाला खात्री आहे.”

या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *