EntertainmentMarathi

‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित… ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘कढीपत्त्या’चा सुगंध सध्या मराठी सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत पसरला आहे. ‘कढीपत्ता’ शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट शीर्षकापासून नायक-नायिकेच्या नव्या कोऱ्या जोडीपर्यंतच्या विविध वैशिष्ट्यांमुळे लाइमलाईटमध्ये आला आहे. घोषणेनंतर पोस्टर्सच्या माध्यमातून या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला होता. आता ‘कढीपत्ता’चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शीर्षकाप्रमाणेच ‘कढीपत्ता’चा टिझर चटकदार असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अल्पावधीतच ‘कढीपत्ता’चा टिझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यात यशस्वी ठरला आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘कढीपत्ता’ची प्रस्तुती युवान प्रोडक्शनची असून, निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. दिग्दर्शक विश्वा यांनी कथा लेखनासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. एका अनोख्या प्रेमकथेची झलक ‘कढीपत्ता’च्या टिझरमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीमध्ये उखाण्याला एक वेगळेच महत्त्व आहे. लग्नकार्यात तर नेहमी उखाणा घेतलाच जातो. ‘कढीपत्ता’ या चित्रपटाचा टिझरही एका खुमासदार उखाण्याने सुरू होतो. खरं तर अगोदर स्त्रिया उखाणा घेतात आणि नंतर पुरुषांना उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो. ‘कढीपत्ता’च्या टिझरमध्ये मात्र ‘स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी, मीराचं नाव घेतो आज उखाण्यासाठी’ असे म्हणत सर्वप्रथम नायक उखाणा घेतो. नंतर नायिकाही नायकाच्या सूरात सूर मिसळत ‘स्वर्गाच्या साक्षीने देते मी लग्नाचं वचन, ललितच आहे माझा जानेजिगर जानेमन’ असा उखाणा घेते. मात्र टिझरच्या अखेरपर्यंत दोघांचे प्रेमप्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. सुरुवात आणि शेवट यांच्या दरम्यान असे काय घडते ज्यामुळे दोघांनाही टोकाचे पाऊल उचलायला लागते हा प्रश्न टिझर पाहिल्यावर सतावू लागतो आणि ‘कढीपत्ता’बाबतची उत्सुकता जागृत होते.

अभिनेता भूषण पाटील या चित्रपटाचा नायक आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत यशस्वी झालेल्या अभिनेत्री रिद्धी कुमारने ‘कढीपत्ता’च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत एंन्ट्री केली आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना एका फ्रेश जोडीची नावीन्यपूर्ण केमिस्ट्रीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटात आजच्या काळातील एका जोडप्याची कथा आहे. आजच्या तरुणाईची विचारसरणी, त्यांचे भावविश्व, त्यांची मानसिकता, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांची निर्णयक्षमता, एकमेकांसोबतचे नातेसंबंध, जोडीदाराबाबतच्या अपेक्षा असे विविध पैलू ‘कढीपत्ता’मध्ये उलगडले जाणार आहेत. त्यामुळे ही अनोखी प्रेमकथा सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास निर्माता-दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.

YouTube player

‘कढीपत्ता’मध्ये भूषण आणि रिद्धीसोबत संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, गार्गी फुले, गौरी सुखटणकर, सानिका काशीकर, निशा माने आदी कलाकार दिसणार आहेत. आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत लक्ष वेधणार आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरक आहेत. हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीते सादर केली जाणार आहेत. गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी संगीत दिले आहे. पल्लवी पाटील आणि गार्गी पाटील यांनी वेशभूषा केली असून, किरण सावंत यांनी रंगभूषा केली आहे. तन्मय भिडे यांनी पार्श्वसंगीत दिले असून, ऋषीराज जोशी यांनी संकलन केले आहे. विशाल चव्हाण या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते, तर संयुक्ता सुभाष प्रोजेक्ट हेड आहेत.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *