EntertainmentMarathi

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- ‘ताठ कणा’

‘माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते’, हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना उपचार व आपल्या मौलिक मार्गदर्शनाने ‘ताठ कण्याने’ जगायला शिकवणारे जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी मानवतेच्या तत्वाचा स्वीकार करत आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. लाखो रूग्णांना वेदनामुक्त करणारी एक विशेष सर्जरी शोधून काढताना त्यांनी घेतलेले कष्ट, त्या संशोधनावर शंका व्यक्त केली गेली तेव्हाचा संघर्ष आणि आपल्या रूग्णांच्याच मदतीने त्यांनी त्यावर जिद्दीने केलेली मात यावर आधारित ‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर व ‘स्प्रिंग समर फिल्मस’ चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत. समर्पण, सेवा, प्रेम आणि प्रामाणिकपणा याची श्वास रोखून धरायला लावणारी, उत्कंठापूर्ण कथा दाखवणाऱ्या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक अशोक हांडे उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी यावेळी मनापासून शुभेच्छा दिल्या

‘माझ्या एका पेशंटला माझ्यावर चित्रपट करावासा वाटणे हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. माझा प्रवास चित्रपटातून मांडण्यासाठी या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीसाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे’ अशी भावना डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी व्यक्त केली. ‘डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या प्रयत्नांमुळे वेदनेच्या संघर्षातून आमचं कुटुंब आणि आम्ही सुखरूप बाहेर पडलो. रामाणी यांच्या चिकाटीचा, संघर्षाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न आज पूर्ण होतयं, याचा आनंद आहे’ असं रोहन मुडशिंगीकर यावेळी म्हणाले.

‘हा चित्रपट उत्तम टीमवर्कचा एक आदर्श नमूना आहे. आमच्या सगळ्यांच्या पुण्याईने या चित्रपटाचा भाग होता आले’ अशा शब्दांत दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी आपला आनंद व्यक्त केला. डॉक्टरांची भूमिका करायला मिळाली ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, याप्रसंगी बोलताना अभिनेता उमेश कामतने सांगितले. डॉक्टरांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या सहचारिणीची भूमिका करणे ही माझ्यासाठी महत्त्वाची आणि खूप काही शिकवणारी बाब होती, असे अभिनेत्री दिप्ती देवी हिने सांगितले,

‘डॉक्टरांचा एवढा प्रदीर्घ जीवनप्रवास मांडणं हे लिखाणाच्या दृष्टीने अवघड काम होतं. हे आव्हान डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच पेलून दाखवू शखलो’ अशा शब्दांत लेखक श्रीकांत बोजेवार यांनी आपला आनंद व्यक्त केला. ‘या लिखाणाच्या दरम्यान डॉक्टरांच्या कामाचं जिकीरीचं स्वरूप लक्षात आलं. त्यांना आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांतून, ज्या शंका व्यक्त केल्या गेल्या त्यांना डॉक्टरांनी आपल्या कामातून उत्तर कसं दिलं हे प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे’ असंही बोजेवारांनी यावेळी सांगितलं,

‘ताठ कणा’ या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकारांच्या भूमिका आहेत,

चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *