दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी ‘माणूस नावाचं वादळ’ हा सामाजिक मराठी चित्रपट २ जानेवारीपासून सिनेमागृहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिशा दिली ती केवळ विचारांनी नाही तर कृतीने. त्यांनी अनुभवलेलं दुःख, अन्याय भेदभावच पुढे त्यांच्या प्रेरणेच सामर्थ्य बनलं. ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ ही त्यांची घोषणा दिशाहीन समाजाच्या वाटचालीचा आधार ठरली. अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता, अन्याय, दडपशाही विरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते केवळ नेता नव्हते तर ते एका युगाचे परिवर्तनकर्ते होते. त्यांच्या विचारांनी दिशाहीन समाजाला नवजीवन दिलं आत्मविश्वास दिला आणि मानवतेचा मार्ग दाखवला.
मात्र आजकाल समाजात त्यांचे विचार कुठेतरी पुसले जात आहेत की काय असे चित्र काळानुसार बदलताना दिसले. दरम्यान, त्यांचे विचार आचरणात आणून त्यांनी दिलेला लढा लक्षात घेऊन आज आपण तसे वागलो तर कदाचित पूर्वीसारखं चित्र पाहायला मिळेल. कारण त्यांचे विचार कायम समाजाला दिशा देणारे ठरले आणि पुसट झालेल्या या विचारांची उजळणी आता पुन्हा एकदा होणार आहे. हो. कारण ‘माणूस नावाचं वादळ’ हा मराठी सामाजिक चित्रपट लवकरच दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी मोठा पडद्यावर येत आहे. येत्या २ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘माणूस नावाचं वादळ’ या चित्रपटात प्रशांत विलास सोनावणे, प्रीती वर्हाडे, प्रमोद सुर्वे, परेश मोरे, चंद्रकांत सावंत, दर्शना मोहिते, राजकुमार सावंत, विकास सूर्यवंशी, तुषार मिलिंद, साक्षी कदम, रूही जाधव, शर्वरी, उदयभान भारती, वैशाली जाधव ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
ठाणे-रायगड जिल्यातील बहुजन युवा नेतृत्व श्री प्रविण भाऊ राऊत प्रस्तुत, डिजिम्स आर्टिस्ट्री निर्मित, एस पी एफ एन्टरटेन्मेंट आणि अमायरा स्टुडिओस यांच्या संयुक्त सहकार्याने हा चित्रपट असणार आहे. निर्माता योगेश जगदीश लाड यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर दिग्दर्शक प्रशांत विलास सोनावणे याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. प्रशांत सोनावणे यांनी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी धुरा सांभाळली आहे. तर विलास सोनावणे, पुरुषोत्तम वेल्हे यांनी चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली. तर संगीताची जबाबदारी विशाल पाटील, केदार पानसरे, यशोधन बापट यांनी सांभाळली. नववर्षात म्हणजेच २ जानेवारी २०२६ ला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
By Sunder M
