EntertainmentMarathi

क्रांतिज्योतीच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाचा शो आयोजित

बहुचर्चित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषेचे महत्त्व, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी वेध घेणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन संपूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे. मराठी भाषेचा आणि शिक्षणाचा सातत्याने विचार करणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्यांच्यासारखे समविचारांचे ॲड. अभिजीत पोखरणीकर यांच्या सहकार्याने पुण्यात एक स्तुत्य उपक्रम राबवला. ॲड. अभिजीत पोखरणीकर हे एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक आहेत. एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्ट पुण्यातील सिग्नल स्कूलमधील मुलांचे शिक्षण, संगोपन करते. प्रमोशनदरम्यान चलचित्र मंडळी यांच्या वतीने आणि एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या सहकार्याने सिग्नल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. पुण्यातील राहुल थिएटर येथे विद्यार्थ्यांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट पाहिला. या मुलांनी पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला असून मनमुराद आनंद लुटला. त्यांच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट चित्रपटात पाहायला मिळते. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

 

 

By Sunder 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *