Entertainment

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित

आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास हे गाणं मांडतं.

YouTube player

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात, ” ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *