EntertainmentMarathi

MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ प्रस्तुत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची झलक यातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

टेंबूरखेड या छोट्याशा गावातील काही तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणांना वाटत असते की, पुस्तकांमध्ये असलेली उत्तरेच आयुष्याचे सर्व प्रश्न सोडवतील. मात्र, नियती त्यांच्या समोर असा एक गंभीर विषय आणून उभा करते, ज्याकडे समाज आणि व्यवस्था दोघांनीही दुर्लक्ष केलेले असते. हा ‘आऊट ऑफ सिलॅबस’ विषय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो आणि तेथून सुरू होतो त्यांच्या संघर्षाचा खरा प्रवास. निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत हे तरुण जीवनाच्या खऱ्या परीक्षेत स्वतःला कसे सिद्ध करतात, याची थरारक आणि प्रेरणादायी मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे

YouTube player

डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली असून, लेखक अनिकेत कोरडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या कथेला दिग्दर्शक नवीन देशबोनिया यांनी प्रभावीपणे पडद्यावर आणले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करत सचिन मनोहरराव ढोकणे यांनी ‘एआय क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

चित्रपटाच्या संगीताची धुरा मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या सुमधुर आवाजाने गीतांना विशेष रंग चढला आहे. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून, संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे.

अभिनयाच्या आघाडीवर अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर हे प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार असून, त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची प्रभावी साथ लाभली आहे.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. तरुणाईची स्वप्ने, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुरेख मिलाफ असलेला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर विचार करायला लावणारा आणि सकारात्मक प्रेरणा देणारा अनुभव देईल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

आऊट ऑफ सिलॅबस’ – पुस्तकांच्या पलीकडे… आयुष्याच्या खऱ्या परीक्षेची गोष्ट! प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, येत्या ३ जुलैपासून हा चित्रपट राज्यभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *