EntertainmentMarathi

‘पाणी’च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज ‘नगं थांबू रं’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

‘पाणी’च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज
‘नगं थांबू रं’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘पाणी’ च्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता ताणली असतानाच आता या चित्रपटातील मनाला उभारी देणारे ‘नगं थांबू रं’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झाले आहे. आदिनाथ कोठारे याने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांनी साजेसे संगीत दिले असून हे प्रेरणादायी गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे. मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षकगीत अतिशय स्फूर्तिदायी आहे. या गाण्यातून हनुमंत केंद्रे यांचा पाण्यासाठीचा लढा, संघर्ष आणि त्यांना मिळालेले यश निदर्शनास येत आहे.

YouTube player

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असून नवीन उमेद देणारेही आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणीटंचाई सारखी भीषण समस्या सोडवून गावकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारे हे गाणे आहे. अतिशय भावपूर्ण बोल असलेले हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.

या गाण्याबद्दल शंकर महादेवन म्हणतात, “ज्यावेळी या गाण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी त्वरित होकार दिला. या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर रुजणारे आहेत. मनातील खंत, संघर्ष, यश, आनंद अशा सगळ्याच भावना या गाण्यातून एकत्र व्यक्त होत आहेत. हे गाणे गाताना माझ्यातही तितकाच उत्साह होता. अतिशय उत्स्फूर्तदायी गाणे आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीशी लढा देताना हे गाणे प्रत्येकाला प्रेरणा देणारे ठरेल.”

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *